Wed. Oct 5th, 2022

अखेर हनी सिंगनं मौन सोडलं

बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर हनी सिंग एका वेगळ्याच प्रकरणामुळे सध्या चर्चेत आला आहे. हनी सिंगच्या विरोधात पत्नी शालिनी तलवारने छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायद्यांतर्गत शालिनीने हनी सिंगविरोधात तक्रार नोंदवली आहे. पती हनी सिंग तसेच सासरच्या मंडळीकडून शारीरिक, शाब्दिक, मानसिक छळासोबतच अत्याचाराला अनेकदा सामोरे जावे लागल्याचे शालिनीने म्हटले आहे. त्यानंतर आता हनी सिंगने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

हनी सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हे सगळे आरोप खोटे असल्याचे हनी सिंगने म्हटले आहे.’२० वर्षापासून शालिनी तलवार माझी पत्नी आहे. त्याच शालिनीने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर लावलेले सगळे आरोप हे खोटे आहेत. हे सगळे आरोप ऐकून मला दु:ख झालं आहे. भूतकाळात माझ्या गाण्यांवर आणि माझ्या आरोग्याविषयी अनेक नकारात्मक गोष्टींवरून माझ्यावर टीका करण्यात आल्या, तरी मी कधीही प्रेस नोट किंवा कोणतीही पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, यावेळी शांत राहून काही होणार नाही असं मला वाटलं, कारण यावेळी माझ्या वृद्ध पालकांवर आणि धाकट्या बहिणीवर…जे माझ्या वाईट परिस्थितीत माझ्यासोबत होते त्यांच्यावर आरोप केले आहेत. हे सगळे आरोप बदनाम करणारे आहेत,’ असे हनी सिंग म्हणाला.

पुढे हनी सिंग म्हणाला,’मी गेल्या १५ वर्षांपासून या इंडस्ट्रीत आहे आणि देशभरातील कलाकार आणि संगीतकारांसोबत काम केले आहे. माझ्या टीममध्ये गेल्या १० वर्षांपासून जे लोक आहेत, त्यांना माझ्या आणि माझ्या पत्नीचे संबंध कसे आहेत याबद्दल माहित आहे. ती प्रत्येक चित्रीकरणाला, कार्यक्रमाला आणि मीटिंगमध्ये सोबत असते. या सगळ्या आरोपांचे मी खंडन करतो पण मी यावर काही बोलणार नाही कारण हे प्रकरण न्यायालयात आहे. या देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला विश्वास आहे की सत्य लवकरच समोर येईल.’

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.