Sun. Aug 18th, 2019

‘फैजाबाद… आज से तुम्हारा नाम अयोध्या!’

0Shares

‘अलाहबादचं’ नामांतर ‘प्रयागराज’ केल्यानंतर ‘आज से तुम्हारा नाम’ या वाक्याचे मिम्स सोशल मीडियावर तुफान वायरल झाले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना नामांतराबद्दल सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. मात्र योगी आदित्यनाथ मात्र प्रयागराजनंतर आणखी एकदा नामांतराची खेळी खेळत असल्याचं पाहायला मिळालं. ‘फैजाबाद’ जिल्ह्याचं नाव बदलून ‘अयोध्या’ ठेवणार असल्याचं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

अयोध्येमध्ये दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ उपस्थित होते. यावेळी राम मंदिराबद्दल घोषणा होत होत्या. योगी आदित्यनाथ प्रभू रामचंद्रांच्या पुतळ्याबद्दल काही घोषणा करतील, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र योगी आदित्यनाथ यांनी वेगळीच घोषणा केली.

“आम्ही आमचा भूतकाळ पुन्हा जोडण्यासाठी अयोध्येला आलो आहोत. अयोध्या ही रामाची ओळख आहे. अयोध्येची ओळख अयोध्या अशीच राहिली आहे. अयोध्येसोबत कोणीही अन्याय करु शकत नाही,” असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

“आज एक नवा संकल्प घेऊन मी अयोध्येत आलो आहे. अयोध्येला काय हवं आहे, हे संपूर्ण देशाला माहीत आहे,” असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.

याआधी कोणी मुख्यमंत्री अयोध्येत आला होता का? असा सवाल करत आपण दीड वर्षात सहा वेळा अयोध्येला आलो असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

मेडिकल कॉलेज आणि विमानतळही!

फैजाबाद जिल्हा यापुढे अयोध्या म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी आणखीही महत्त्वाच्या घोषणा केल्या. अयोध्येत मेडिकल कॉलेज सुरु करण्यात येणार आहे आणि या कॉलेजचं नाव ‘दशरथ’ असेल, अशी घोषणा त्यांनी केली.

याचप्रमाणे लवकरच येथे विमानतळ उभारण्यात येणार असून त्याला प्रभू रामचंद्रांचं नाव देणार असल्याचंही योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलं आहे.

 

दिवाळीनिमित्त अयोध्यामध्ये आज मोठा दिपोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्यावेळी तीन लाखापेक्षा जास्त दिव्यांनी शरयू नदीचा घाट सजवण्यात आला.

या कार्यक्रमासाठी दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडी किमजुंग सूक या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *