वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकवर मलेशियात भाषणबंदीची कारवाई!

वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरु आणि मनी लॉन्डरींग प्रकरणातील आरोपी झाकीर नाईक याच्या भाषणांवर मलेशियात बंदी घालण्यात आलीये. त्यानंतर झाकीर नाईकनं मलेशियन नागरीकांची माफीही मागितली आहे.
झाकीर नाईकनं मलेशियातील हिंदू आणि चिनी वंशांच्या नागरीकांविरुद्ध काही दिवसांपूर्वी वर्णद्वेषी वक्तव्य केले होते.
त्यानंतर त्याला मलेशियातून हाकलून देण्याची मागणी करण्यात आली होती.
या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी त्याची 10 तास चौकशी केली आणि त्यानंतर त्याला सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यावर तसेच भाषण करण्यावर बंदी घालण्यात आली.
द्वेषयुक्त भाषणांद्वारे सामाजिक सलोखा बिघडवण्यास उत्तेजन दिल्याप्रकरणी आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी 2016 पासून भारताला हवा असलेला झाकीर नाईक भारत सोडून पळाला आहे.
8 ऑगस्ट रोजी त्याने मलेशियामध्ये केलेल्या भाषणात तेथील हिंदूंच्या देशनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
तसंच चिनी वंशाचे नागरिक मलेशियाचे जुने पाहुणे असल्याचे खोचक विधान केलं होतं.
या वर्णद्वेषी वक्तव्यांप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी त्याची चौकशी केली होती.
त्यानंतर सोमवारी पुन्हा त्याला पोलीस मुख्यालयात चौकशीसाठी पाचारण करण्यात आलं होतं.
त्यानुसार दुपारी 3.15 वाजता आपल्या वकिलासह हजर झालेल्या झाकीरची रात्री दीड वाजेपर्यंत कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर भाषणबंदीची कारवाई करण्यात आली.