रेल्वे स्टेशनच्या Wi-Fi वर अभ्यास करून हमालाने मिळवली सरकारी नोकरी

रेल्वे स्टेशन्सवर सुरू केलेल्या Wi-Fi पेक्षा रेल्वेची स्थिती सुधारा, असा एक टिकेचा सूर नेहमीच ऐकू येतो. पण रेल्वे स्टेशन्सवर असणाऱ्या wi-fi नेही माणसाचं आयुष्य बदलू शकतं, हे केरळमधल्या एका घटनेनं दाखवून दिलंय. केरळच्या एर्नाकुलम स्टेशनवर हमालीचं काम करणाऱ्या हमालाने लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली. आणि त्यासाठी त्याला मदत झाली रेल्वे स्टेशनवरील wi-fi ची.

कसा केला त्याने Wi-Fi चा उपयोग?

सर्वसामान्यपणे सरकारी परिक्षांचा अभ्यास करताना बरेच विद्यार्थी ढिगभर पुस्तकांचा अभ्यास करतात.

परंतु एर्नाकुलम स्टेशनवर हमाली करणाऱ्या श्रीनाथनं अभ्यासासाठी वापरलं स्टेशनवरचं मोफत wi-fi.

दहावी पास असलेला श्रीनाथ आपल्या मोबाईल फोनवर इअरफोन्स लावून ऑनलाईन लेक्चर्स ऐकायचा.

एवढंच नव्हे,तर तो शिक्षकांशी संपर्क करून आपल्या अभ्यासातल्या शंकाही सोडवायचा.

दिवसभरातून जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे तो अभ्यास करायचा.

काय म्हणाला श्रीनाथ?

“मी या आधी तीन वेळा या परीक्षा दिल्या. पण नंतर परीक्षेचा अभ्यास मी स्टेशनवरील Wi-Fi च्या मदतीनं केला. लोकांचं सामान पोहोचवतानाच मला कठीण जाणारे प्रश्न मी सोडवायचो. त्यामुळे माझा अभ्यास पण वेळच्या वेळी पूर्ण व्हायचा. एर्नाकुलम स्टेशनवर 2016 मध्ये फ्री Wi-Fi ची सेवा सुरू झाली. 2018 साली मी परीक्षा पास झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया अभियानाच्या सुविधेमुळं हे यश मिळू शकलं. फ्री Wi-Fi मुळं प्रश्नपत्रिका आणि पुस्तकांचा खर्च वाचला. लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालो. त्यामुळे आता मला सरकारी नोकरी मिळाली.”

Exit mobile version