Friday, May 24, 2024 10:05:04 AM

गोवा शिपयार्डमध्ये गस्ती जहाजाच्या निर्मितीचा शुभारंभ

गोवा शिपयार्डमध्ये गस्ती जहाजाच्या निर्मितीचा शुभारंभ

वास्को द गामा, ४ मे २०२४, प्रतिनिधी : गोवा शिपयार्डमध्ये गस्ती जहाजाच्या निर्मितीचा शुभारंभ झाला. शुभारंभ प्रसंगी कंट्रोलर ऑफ वॉरशिप कन्स्ट्रक्शन अँड ॲक्विझिशनचे व्हाईस ॲडमिरल बी. शिवकुमार, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष बी के उपाध्याय आणि भारतीय नौदल आणि गोवा शिपयार्डचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गोवा शिपयार्ड, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजीनिअर्स आणि संरक्षण मंत्रालय यांच्यात अकरा जहाजांच्या निर्मितीचा करार झाला आहे. या करारानुसार सात गस्ती जहाजांची निर्मिती गोवा शिपयार्डमध्ये होणार आहे. तर चार युद्धनौकांची निर्मिती गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजीनिअर्स कोलकाता येथे करणार आहे.

गस्ती जहाजांचा वापर चाचेगिरी विरोधात तसेच समुद्र किनाऱ्यांच्या संरक्षणासाठी आणि घुसखोरांना रोखण्यासाठी, किनारी परिसरात पाळत ठेवण्यासाठी केला जाणार आहे. समुद्रातील तेलविहिरींचे आणि खाणींचे संरक्षण करण्यासाठीही गस्ती जहाजांचा वापर केला जाईल. ही जहाजे भारतीय नौदलाला हिंद महासागर क्षेत्रातील देशाच्या आर्थिक आणि भू-राजकीय हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या लढाऊ क्षमतांचा विस्तार करण्यास उपयुक्त ठरणार आहेत. हा उपक्रम भारतीय नौदलाच्या स्वदेशी युद्धनौका बनवण्याच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या निमित्ताने आत्मनिर्भरतेकडे आणखी वेगाने वाटचाल सुरू होणार आहे.

  

सम्बन्धित सामग्री