Job Scam : देशाची राजधानी दिल्लीमध्ये उच्चस्तरीय फसवणुकीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. केंद्र सरकारशी संलग्न असलेल्या एका बनावट 'पर्यावरण संरक्षण परिषदेचे' थेट अध्यक्षपद देण्याचे आमिष दाखवून हरियाणातील एका मोठ्या व्यावसायिकाची तब्बल 2.9 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आरोपी भामट्यांनी पीडित व्यावसायिकाचा पूर्ण विश्वास संपादन करण्यासाठी दिल्लीतील अत्यंत उच्चभ्रू चाणक्यपुरी परिसरातील 'अशोका' या पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वतःला कौन्सिलचे वरिष्ठ अधिकारी भासवून एक बनावट मुलाखत सत्र देखील आयोजित केले होते.
सरकारी गाडी, व्हीआयपी सुरक्षा आणि 500 कोटींच्या बजेटचे मोठे आमिष
आरोपींनी हरियाणात वृक्षारोपण आणि त्याच्या देखभालीसाठी तब्बल 500 कोटी रुपयांचा अवाढव्य निधी उपलब्ध असल्याचा खोटा दावा केला होता. जर या व्यावसायिकाने या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले, तर त्यांना मोफत आलिशान सरकारी निवासस्थान, व्हीआयपी पोलीस सुरक्षा, व्हीआयपी शासकीय वाहन, आकर्षक मासिक पगार आणि सर्व महत्त्वाच्या सरकारी निविदा प्रक्रियेत थेट निर्णय घेण्याचे अधिकार मिळतील, असे मोठे आमिष दाखवण्यात आले. व्यावसायिकाला जाळ्यात ओढण्यासाठी आरोपींनी या कौन्सिलची एक हुबेहूब बनावट वेबसाईट तयार करून दाखवली होती. या कथित नियुक्तीच्या बहाण्याने आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करून घेतले तसेच मोठी रोख रक्कमही उकळली.
कर्ज उभे करून राहते घर गहाण ठेवले; तपासात भामटेगिरी उघड
आरोपी भामट्यांची ही अवाढव्य पैशांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि रक्कम उभी करण्यासाठी पीडित व्यावसायिकाने मोठे बँक कर्ज घेतले तसेच आपले राहते घरही गहाण ठेवले. संपूर्ण बनावट प्रक्रिया पार पडल्यानंतर आरोपींनी त्यांना एक बोगस नियुक्तीपत्र सोपवले. मात्र, प्रदीर्घ वाट पाहूनही प्रत्यक्ष पदभार न मिळाल्याने संशय आलेल्या व्यावसायिकाने सरकारी पातळीवर चौकशी सुरू केली. तेव्हा केंद्र सरकारने अशी कोणतीही परिषद स्थापन केलीच नसल्याचे आणि दिलेले पत्र पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले. फसवणूक उघडकीस आल्यानंतर पीडिताच्या तक्रारीवरून चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात 6 संशयित आरोपींविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – Mumbai Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; तिघे गंभीर जखमी
सायबर घोटाळेबाजांच्या टोळीचा पर्दाफाश; 4 जणांना केली अटक
दुसऱ्या एका मोठ्या कारवाईत, दिल्ली पोलिसांनी चीनमधून चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर घोटाळेबाजांना कमिशनवर बँक खाती पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. हे भामटे फसवणुकीची रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित करत असत. या प्रकरणात पोलिसांनी हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून गीतम सिंग (29), ध्रुव (21), अनुज शर्मा (27) आणि गगन यादव (26) या 4 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 9 बँक पासबुक, 5 सिमकार्ड, 6 मोबाईल आणि व्यवहारांची नोंद असलेले रजिस्टर जप्त करण्यात आले आहे.