कोल्हापूर: नुकताच, कोल्हापूरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कोल्हापूर सांगली महामार्गावर असलेल्या अतिग्रे फाट्याजवळील एका लॉजवर महिलेचा खून झाला आहे. घेतलेले पैसे परत देत नसल्याच्या रागातून प्रियकराने प्रेयसीचा खून केला. ही घटना गुरुवारी रात्री समोर आली.
आरोपी प्रियकराचे नाव आदम गौस पठाण (वय: 45) असे आहे. मृत महिलेचे नाव सुमन सुरेश सरगर (वय: 35) आहे. मृत महिला उचगाव येथील रहिवासी होती. आरोपी प्रियकर घुणकीचा राहणारा आहे. घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली.
नेमकं प्रकरण काय?
माहितीनुसार, आदम आणि सुमन यांचे प्रेमसंबंध होते. गेल्या सात वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते. इतकंच नाही, तर त्यांच्यात आर्थिक व्यवहार देखील होते. काही दिवसांपासून सुमन वारंवार आदमकडे सात लाख रुपयांची मागणी करू लागली. मात्र, आदमला ही रक्कम देणे असल्यामुळे, तो प्रचंड वैतागला. अखेर, या त्रासाला कंटाळून आदमने सुमनला मारण्याचा कट रचला.
ठरल्याप्रमाणे, गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आदमने सुमनला अतिग्रे येथील सागरीका लॉजवर घेऊन गेला. तिथे पोहोचताच, आदमने सुमनच्या डोक्यात हातोडीने वार केला. त्यामुळे, सुमनचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळ होऊनही दोघे बाहेर न आल्याने लॉजच्या मालकाला संशय आला. जेव्हा, लॉजच्या मालकाने दरवाजा तोडला, तेव्हा त्याने पाहिले की सुमन रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि आदम दिवसभर तिथेच बसून होता.
जेव्हा लॉजचा मालक दरवाजा उघडला तेव्हा आदम पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, लॉजच्या मालकाने आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले. तसेच, त्यांनी आदमला एका खोलीत कोंडून ठेवले. या घटनेनंतर, त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. तेव्हा घटनास्थळी येऊन पोलिसांनी आदमला ताब्यात घेतले. तपासादरम्यान अशी माहिती समोर आली की, आदम पठाण हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. यापूर्वी, आदमने त्याच्या पत्नीचा खून केल्याचा आरोप आहे. या संदर्भात त्याच्यावर खटला सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.