Jalna Crime : तुपाच्या नावाखाली केमिकलचा जीवघेणा खेळ! तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यानंतर जालन्यातील ‘या’ मोठ्या कारखान्यावर FDA ची धाड

या धडक कारवाईत तब्बल 13 लाख 4 हजार 539 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या अवैध व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.

Jalna Crime : तुपाच्या नावाखाली केमिकलचा जीवघेणा खेळ! तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यानंतर जालन्यातील ‘या’ मोठ्या कारखान्यावर FDA ची धाड

Jalna Crime : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी परिसरातील एका बनावट तूप निर्मिती केंद्रावर छापा टाकला आहे. या धडक कारवाईत तब्बल 13 लाख 4 हजार 539 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या अवैध व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील भेसळखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या इशाऱ्यानंतर ही कारवाई करण्यात आली.   

खाद्यतेलापासून तयार होत होते बनावट तूप

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भेसळविरोधी मोहिमेला वेग दिला आहे. त्यांच्या निर्देशानुसार 3 जून रोजी तीर्थपुरी येथील 'मे. मुंदडा इंडस्ट्रीज'वर छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान वनस्पती तेल, खाद्यतेल आणि सुगंधी रासायनिक एसेन्स यांचे मिश्रण करून तुपासारखा दिसणारा पदार्थ तयार केला जात असल्याचे उघड झाले. हा पदार्थ विविध ब्रँडच्या नावाखाली बाजारात विक्रीसाठी पाठवला जात असल्याचा संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे.

हजारो लिटर बनावट साठा जप्त

या कारवाईत अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बनावट तूप आणि त्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. एकूण 1903 लिटर बनावट साठा जप्त करण्यात आला असून त्यामध्ये 1121 लिटर विविध ब्रँडचे पॅकबंद बनावट तूप, 663 लिटर सुटे तूप, 118 लिटर रिफाइंड सोयाबीन तेल आणि तूपाचा सुगंध निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणारे रासायनिक एसेन्स यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत 13 लाख 4 हजार 539 इतकी असल्याचे प्रशासनाने सांगितले.

8 नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत

कारवाईदरम्यान अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी विविध प्रकारच्या तूप, तेल आणि एसेन्सचे एकूण 8 नमुने गोळा केले आहेत. हे नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित मालक आणि जबाबदार व्यक्तींवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – FDA seizes substandard : FDA ची मोठी कारवाई, या जिल्ह्यांतून तब्बल 32 लाखांचा भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा माल जप्त; प्रतिबंधित वस्तूंची विक्री केल्याप्रकरणी 14 जणांना अटक

कारखाना सील; उत्पादन आणि विक्रीवर बंदी

कारवाईनंतर प्रशासनाने संबंधित कारखाना तात्पुरत्या स्वरूपात पूर्णपणे सील केला आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत तेथे कोणत्याही प्रकारचे उत्पादन, साठवणूक किंवा विक्री व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे. तपास पूर्ण होईपर्यंत कारखान्यावरील निर्बंध कायम राहणार आहेत.

नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

दरम्यान, नागरिकांनी तूप किंवा अन्य खाद्यपदार्थ खरेदी करताना पॅकिंगवरील FSSAI लायसन्स क्रमांक, उत्पादनाची तारीख आणि ब्रँडची खात्री करूनच खरेदी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number