Crime News: सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर 'रील्स' बनवून प्रसिद्धी मिळवण्याचे वेड अनेकांच्या डोक्यात घर करून आहे. मात्र, याच प्रसिद्धीच्या नादात एका चोरट्या महिलेला थेट तुरुंगाची हवा खावी लागली आहे. डेहराडूनमध्ये घडलेल्या एका चक्रावून टाकणाऱ्या घटनेत, वर्षभरापूर्वी चोरीला गेलेले मौल्यवान दागिने घालून एका घरकाम करणाऱ्या महिलेने इन्स्टाग्रामवर रील पोस्ट केली. दुर्दैवाने, हा व्हिडिओ थेट मालकिणीच्या नजरेस पडला आणि वर्षभरापासून दडलेले चोरीचे मोठे रहस्य अवघ्या काही सेकंदांच्या व्हिडिओमुळे उघडकीस आले.
तब्बल 10 लाख रुपयांचे दागिने गायब; नोकराणीच्या आत्मविश्वासाने मालकीणच चुकली
ही थरारक घटना उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथील आहे. आयटी पार्कजवळील 'सिक्का किमाया ग्रीन्स' परिसरात राहणाऱ्या नितीशा वत्स यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या सुमारे 1 वर्षापूर्वी जखन येथील 'दून रिपब्लिक अपार्टमेंट्स'मध्ये वास्तव्यास होत्या. त्यादरम्यान त्यांच्या घरातून हिऱ्याच्या 2 अंगठ्या, सोन्याची एक साखळी आणि हिऱ्याचे अत्यंत मौल्यवान 'हार्ट-शेप्ड' (हृदयाच्या आकाराचे) पेंडंट अचानक चोरीला गेले होते. त्यावेळी त्यांना घरात काम करणाऱ्या विमला देवी नावाच्या महिलेवर संशय होता. मात्र, संशय व्यक्त केला असता विमलाने इतका प्रचंड आत्मविश्वास दाखवला आणि स्वतःच पोलिसांत जाण्याची तयारी दर्शवली, की नितीशा यांचा संशय दूर झाला आणि दागिने आपल्याकडूनच कुठेतरी हरवले असावेत, असा त्यांचा समज झाला.
चोरटीने स्वतःच पायावर मारून घेतला धोंडा; व्हॉट्सॲप अन् इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल
दागिने चोरून 1 वर्ष उलटल्यानंतर विमला देवीला वाटले की आता धोका टळला आहे. तिने तो मौल्यवान ऐवज स्वतः अंगावर चढवला आणि त्यावर एक रील बनवून ती इन्स्टाग्राम तसेच व्हॉट्सॲप स्टेटसवर अपलोड केली. हा व्हिडिओ नितीशा वत्स यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीने पाहिला आणि त्यांनी तातडीने नितीशा यांना याबद्दल माहिती दिली. व्हिडिओ आणि फोटो नीट तपासल्यानंतर नितीशा यांना मोठा धक्का बसला; कारण विमलाच्या अंगावर चमकणारे दागिने दुसरे तिसरे कोणी नसून वर्षभरापूर्वी गायब झालेले त्यांचेच मौल्यवान हिरे आणि सोने होते.
पोलिसांनी विमलाला ठोकल्या बेड्या
दागिन्यांची खात्री पटताच, नितीशा वत्स यांनी 1 जुलै रोजी राजपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपली माजी मोलकरीण विमला हिच्याविरुद्ध अधिकृत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कोणतीही दिरंगाई न करता तातडीने कारवाई करत विमलाला अटक केली. तिच्या घरातून पोलिसांनी चोरीला गेलेले सर्व हिरे आणि सोन्याचे दागिने जप्त केले, ज्यांची बाजारभावाप्रमाणे किंमत तब्बल 10 लाख रुपये आहे.
दरम्यान, पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी विमलाने आपला गुन्हा कबूल केला. तिने सांगितले की, मालकिणीचा तिच्यावर आंधळा विश्वास होता आणि याच विश्वासाचा तिने गैरफायदा घेतला. खोलीतील लॉकरमध्ये ठेवलेले महागडे दागिने पाहून तिचा तोल गेला होता आणि संधी मिळताच तिने त्यावर हात साफ केला. दागिने गायब झाल्यावर तिनेच मालकिणीला धीर देत "तुम्हीच कुठेतरी विसरला असाल" असे सांगून दिशाभूल केली होती. हे दागिने खूप महागडे असल्याने ते बाजारात विकणे तिला शक्य झाले नाही, म्हणून तिने ते स्वतःकडेच ठेवले होते. मात्र, एका छोट्याशा रीलमुळे आपले बिंग फुटेल, अशी कल्पना तिने स्वप्नातही केली नव्हती.