‘शांत राहा, नाहीतर तुलाही…’; गुन्ह्याच्या साक्षीदाराला आरोपी चेतनने दिली होती धमकी, तपासात धक्कादायक खुलासा

केतन अग्रवाल नावाच्या तरुणाला त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी लोहगडावरून कथितरीत्या खाली ढकलून दिलं होतं. ही भीषण घटना एका प्रत्यक्षदर्शीने डोळ्यांनी पाहिली होती.

‘शांत राहा, नाहीतर तुलाही…’; गुन्ह्याच्या साक्षीदाराला आरोपी चेतनने दिली होती धमकी, तपासात धक्कादायक खुलासा
गुन्ह्याच्या साक्षीदाराला आरोपी चेतनने दिली होती धमकी

पुणे: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी घडलेल्या खळबजनक गुन्ह्याप्रकरणी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. केतन अग्रवाल नावाच्या तरुणाला त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी लोहगडावरून कथितरीत्या खाली ढकलून दिलं होतं. ही भीषण घटना एका प्रत्यक्षदर्शीने डोळ्यांनी पाहिली होती. विशेष म्हणजे, या हत्येचा साक्षीदार असलेल्या त्या व्यक्तीला आरोपी चेतनने “शांत राहा, नाहीतर मी तुलाही किल्ल्यावरून खाली फेकून देईन,” अशी गंभीर धमकी दिली होती.

प्रत्यक्षदर्शीचा जबाब आणि खळबलातक खुलासे

भीतीच्या वातावरणात वावरणार्‍या या गुप्त साक्षीदाराने घटनेनंतर पाच दिवसांनी, प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या पाहिल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधून आपला जबाब नोंदवला. साक्षीदाराने दावा केला आहे की, किल्ल्यावर सियाने चेतनकडे इशारा केला आणि त्यानंतर चेतनने केतनच्या पायावर लाथ मारली, ज्यामुळे तो दरीत कोसळला. आपल्या जबाबात साक्षीदाराने असेही नमूद केले की, कडक ऊन असतानाही चेतनने ‘हुडी’ घातली होती, ज्यामुळे तो गर्दीत सहज लक्षात राहण्यासारखा होता. किल्ल्यावर चढत असताना एका व्यक्तीने त्याला इतक्या उन्हात हुडी घालण्याचे कारणही विचारले होते. आता पोलीस या प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाची पडताळणी इतर उपलब्ध पुराव्यांशी करत आहेत.

तांत्रिक पुरावे आणि मोबाईल डेटाचे फॉरेन्सिक विश्लेषण

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तपासाचा व्याप वाढवला आहे. तपासादरम्यान १२ टीबी (TB) डेटा, सहा मोबाईल फोन, नऊ पेन ड्राइव्ह, बॅकअप आणि कॉल रेकॉर्ड्ससह अत्यंत महत्त्वपूर्ण तांत्रिक पुरावे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. फॉरेन्सिक विश्लेषणादरम्यान पोलिसांनी सोशल मीडियावरील हालचालींची कसून तपासणी केली असून, डिलीट केलेले काही चॅट्स यशस्वीरीत्या रिकव्हर करण्यात आले आहेत. तपासातून समोर आले आहे की, आयफोनवरून डेटा आणि चॅट्स कायमस्वरूपी कसे डिलीट करायचे, याची माहिती आरोपींकडून शोधली गेली होती. याशिवाय, सियाने घरात लपवून ठेवलेला आणखी एक मोबाईल फोन नष्ट केल्याचे उघडकीस आले असून, त्या तुटलेल्या मोबाईलच्या बॅकअपमधूनही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत.

हेही वाचा – लग्नासाठी दबाव, नकार देताच फोटो व्हायरल करण्याची धमकी; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल

आतापर्यंत तिघांना अटक

केतन अग्रवाल आणि सिया यांचे आगामी नोव्हेंबरमध्ये लग्न ठरले होते. 18 जून रोजी ते लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले असताना हा घातपात घडला. सकाळी 10:45 च्या सुमारास सियाने केतनच्या आईला फोन करून तो चुकून दरीत पडून अपघातात मृत पावल्याची बनावी माहिती दिली होती. मात्र, केतनच्या बहिणीला या घटनेबाबत संशय आल्याने प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी सिया, चेतन आणि कट रचण्यात सहभाग असणारा चेतनचा मित्र रितेश हांगे अशा तिघांना अटक केली आहे. यापूर्वी 31 मे आणि 14 जून रोजीही हे दोघे लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेले होते, ज्याचीही पोलीस सखोल चौकशी करत आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number