मुंबई: मुंबईतील काळाचौकी परिसरात शुक्रवारी सकाळी भररस्त्यात एक हृद्यद्रावक आणि थरारक घटना घडली. रागाच्या भरात एका तरुणाने स्वत:च्या प्रेयसीवर चाकूने वार करत तिचा जीव घेतला आणि त्यानंतर स्वत:चाही गळा चिरून स्वत:ला संपवलं. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
काळाचौकीच्या आंबेवाडी परिसरात सोनू बराय (वय: 24) आणि मनीषा यादव हे दोघे राहत होते. काही काळापूर्वी दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र, गेल्या दहा दिवसांपूर्वी त्यांचं नातं तुटलं होतं. शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता दत्ताराम लाड मार्गावरील मयुरेश इमारतीसमोर दोघांची अचानक भेट झाली. या भेटीत वाद वाढला आणि रागाच्या भरात सोनूने खिशातून चाकू काढला आणि मनीषावर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली.
या घटनेनंतर, स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पीडित मनीषा आरडाओरडा करत जवळच असलेल्या 'आस्था नर्सिंग होम'मध्ये धावली. मात्र, सोनू तिच्या मागोमाग आस्था नर्सिंग होममध्ये गेला आणि पुन्हा तिच्यावर चाकूने वार केले. हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर, क्षणाचाही विलंब न करता ज्या चाकूने पीडित मनीषावर चाकूने वार केला, त्याच चाकूने आरोपी सोनूने स्वतःचा गळा चिरला. काही क्षणांतच परिसरात गोंधळ उडाला.
हेही वाचा: Satara Doctor Case : फलटण डॉक्टर अत्याचारप्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला बेड्या ठोकल्या
घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोनूला तातडीने केईएम रुग्णालयात, तर गंभीर जखमी मनीषाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सोनूला मृत घोषित केले, तर मनीषाला प्रथमोपचारानंतर जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र अतिरक्तस्त्रावामुळे सायंकाळी तिचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण काळाचौकी परिसरात भीती आणि दु:खाचे वातावरण पसरले आहे.