महाराष्ट्र एटीएसकडून राज्यभरात मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी कथित संपर्क ठेवणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई सुरू केली आहे. राज्यभरातील 150 हून अधिक ठिकाणी एकाचवेळी शोधमोहीम राबवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानस्थित दहशतवादी आणि गुन्हेगारी नेटवर्कविरोधात राज्यव्यापी सर्च ऑपरेशन सुरु आहे. या दरम्यान पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या पाठबळाने भारतीय युवकांचे कट्टरपंथीकरण, भरती आणि दहशतवादी कारवायांसाठी वापर केल्याचा संशय आहे.
यावेळी एटीएसने बुधवारी सकाळी 8 वाजता मुंबई, पुणे, नागपूर, नालासोपारा, मीरा रोड, अकोला, नांदेड, नाशिक आणि जळगाव या प्रमुख शहरांत छापे टाकले. या कारवाईने राज्यात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील युवकांना लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती असून पाकिस्तानस्थित गुंड शाहजाद भट्टी, अमजद गुज्जर, अबित जट, राणा हुसेन, अब्दुल मेमन, मुन्ना झिंगाडा, फारूक खोखर, जफर सुपारी, शानी टायगर, शेख सलमान, सरफराज डोंगर उर्फ जोरासिंग, अबू मुसा आणि सरकार यांच्याशी संबंधित नेटवर्कवर कारवाई करण्यात आली आहे.
राज्यभरातील 200 हून अधिक संशयित व्यक्तींवर एटीएसचे एकाचवेळी छापे मारण्यात आले असून संशयास्पद संपर्कांची पडताळणी करून देशविरोधी आणि दहशतवादी कारवायांना आळा घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासंदर्भात महाराष्ट्र एटीएसकडून पुढील तपास सुरू आहे.