बदलापूर : बदलापूरमध्ये काही महिन्यांपूर्वी शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा बदलापूरात एका चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेच्या व्हॅनमध्ये चालकानेच या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एका खासगी इंग्रजी शाळेत ही घटना घडली आहे. बदलापूर पश्चिमेच्या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेची ही व्हॅन होती. या व्हॅनमध्ये कुणीही महिला मदतनीस नव्हती. त्यावेळी ही घटना घडली. ही शाळा बदलापूर पश्चिम भागातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते. शाळा सुटल्यानंतर पीडित मुलगी घरी जात होती. त्यावेळी नराधम स्कूल व्हॅनचालकाने चिमुरडी एकटी असताना अत्याचार केले. पीडित चिमुरडी जेव्हा घरी पोहोचली, तेव्हा तिने सगळा प्रकार पालकांना सांगितलं. पालकांनी लगेच पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व्हॅन चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा : Sahar Sheikh Controversy : 'कैसे हराया...?' बोलणाऱ्या सहर शेखवर कारवाई करा', भाजपा नेत्याची मागणी
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्या शाळेच्या व्हॅनमध्ये चार वर्षाच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाला ती व्हॅन फोडण्याचा प्रयत्न केला. "आम्ही शाळेची व्हॅन फोडू आरोपी आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. पोलिसांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे. याा घटनेमुळे बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संबंधित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या प्रकरणात कोणतीही हलगर्जीपणा करू नये, आरोपीवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्ष प्रियांका दामले यांनी केली आहे.