Woman kidnapped to recover a loan: कर्नाटकातील बंगळुरूमध्ये हृदय पिळवटणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने वेळेवर हफ्ता न दिल्याने तिला एका खोलीत डांबून तिची बेदम मारहाण करण्यात आली. तिच्या मुलाचे देखील अपहरण करून त्याला कोंडून ठेवले. एवढ्यावर न थांबता त्या नराधमाने तिला विवस्त्र करून व्हिडिओ काढला व तो व्हायरल करण्याची धमकी सुद्धा दिली.
काय घडलं?
या कृत्यामध्ये 2 महिला आरोपी व एक नराधम सामील आहेत. पीडित महिलेने सुरुवातीला रेश्मा बानू या महिलेकडून 1 लाख रुपये घेतले. त्यानंतर रेश्माच्या मध्यस्थीने नाजत बेगम या महिलेकडून देखील पन्नास हजार रुपये घेतले. दर महिन्याला 5,000 परत देण्याचे ठरलेले. मात्र आर्थिक अडचणीमुळे पीडित महिलेला गेल्या काही महिन्यांपासून व्याजाची रक्कम भरणे शक्य झाले नाही. पैशांसाठी सतत फोन करत असल्याने तिने रेश्माचा फोन नंबर ब्लॉक करत ती थेट आपल्या आईच्या घरी राहायला गेली.
27 ऑगस्टला नाजतने पीडित महिलेला फोन करून काही काम असल्याचे सांगून त्या कामाचे पैसे देखील मिळणार असल्याचे सांगितले. संध्याकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान मेट्रो लेआऊट येथील नाजतच्या घरी पीडित महिला तिच्या लहान मुलाला घेऊन गेली. त्यानंतर तिथे रेश्मा आणि तिचा नवरा सुहैल हे दोघे नाजतच्या घरी पोहोचले आणि घराचा दरवाजा बंद केला. सुहैलने व्याजासहित 11 लाख रुपये मागितले आणि तिच्या हातावर चाकूने वार केला. त्यांनतर दोघांनी तिचा मोबाइल फोन हिसकावून फोडून टाकला.
संध्याकाळच्या दरम्यान पीडित महिला आणि तिच्या मुलाला जबरदस्ती रिक्षात बसवून रेश्माच्या घरी नेले. जर ती पैसे परत करू शकली नाही तर तिला वेश्याव्यवसाय करावा लागेल, अशी धमकी दिली. त्यांनतर तिला आणि तिच्या मुलाला एका रूममध्ये रात्रभर डांबून ठेवले. संध्याकाळी पीडित महिलेला विवस्त्र केलं आणि तिचा व्हिडीओ काढण्यात आला. पैसे परत न केल्यास हा व्हिडीओ व्हायरल करू असे सांगितले.
त्यांनतर तिला पुन्हा कुंबलगोडू येथील रेश्माच्या घरी आणून सोडले. शौचालयाचा वापर करण्यासाठी बाहेर जाण्याची परवानगी मिळताच तिने संधी साधली. तिने आपल्या कुटुंबियांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडित महिलेची व तिच्या मुलाची सुखरूप सुटका केली असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
परंतु कर्जाच्या हफ्त्यांवरून अपहरण व मारहाण करणे या घटना केवळ गुन्हा नसून ते विकृती दर्शवतात. या प्रकरणाचा तपास पोलिस करत असून आरोपींचे मोबाइल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत. पुढील तपास पोलिस करत आहे.