Jalna Crime : राज्यातील धर्मांतर आणि लैंगिक शोषणाची प्रकरणे ताजी असतानाच, जालन्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी बिहारच्या साहिल अन्सारी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पीडितेची ओळख लपवण्यासाठी आरोपी तिला बुरखा घालायला लावून घरी न्यायचा, अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
मैत्री, प्रेम आणि मग अत्याचाराचा सापळा
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी साहिल अन्सारी (राहणार बिहार, सध्या मिल्लतनगर, जालना) आणि पीडित तरुणी यांची ओळख एका महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतल्यानंतर झाली होती. ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले. मात्र, साहिलने या नात्याचा गैरफायदा घेत तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. धक्कादायक म्हणजे, “मी जीवन संपवेन” अशी धमकी देऊन त्याने तिला वारंवार शरीरसंबंधांसाठी भाग पाडले.
ओळख लपवण्यासाठी ‘बुरख्या’चा वापर
पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहिल अन्सारी अत्यंत चलाखीने कृत्य करत होता. रस्त्यावरून ये-जा करताना किंवा आपल्या घरी नेताना तरुणीची ओळख कोणाला पटू नये, यासाठी तो तिला जबरदस्तीने बुरखा घालायला लावत असे. पीडितेने आपल्या तक्रारीत या गंभीर प्रकाराचा उल्लेख केला आहे.
पीडितेची धाडसी तक्रार अन् पोलिसांची कारवाई
साहिलकडून शारीरिक संबंधांची मागणी सातत्याने वाढत गेल्याने पीडित तरुणीने हा सर्व जाच आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर कदीम जालना पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिने तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई करत साहिल अन्सारीला अटक केली आहे.