सातारा: कराड शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पहाटे झालेला अपघात समजून सुरुवातीला दुर्लक्षित राहिलेल्या या प्रकरणाचा अवघ्या काही तासांत खुनाच्या कटात झालेला उलगडा पोलिसांच्या तपासकौशल्याची साक्ष देणारा ठरला आहे. जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या लक्ष्मण श्रीरंग मंडले यांच्या मृत्यूमागे अपघात नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचे समोर आले आहे.
पहाटेच्या सुमारास कराडमधील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहाजवळ एका व्यक्तीचा गंभीर अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जखमी अवस्थेतील व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुरुवातीला हा साधा रस्ते अपघात असल्याचे मानले जात होते.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिलेने मृत व्यक्ती आपले पती असल्याचे सांगितले. मात्र तिच्या जबाबातील काही विसंगती आणि संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांच्या मनात शंका निर्माण झाली. त्यानंतर तपासाची दिशा बदलली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली.
फुटेजमध्ये समोर आलेले दृश्य धक्कादायक होते. लक्ष्मण मंडले रस्त्याने पायी जात असताना एका कारने त्यांना मागून जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर वाहनचालक थांबला नाही. उलट कार पुढे-मागे घेत मंडले यांना पुन्हा चिरडण्यात आले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्यांच्याजवळील सामान उचलले आणि घटनास्थळावरून पलायन केले. काही वेळानंतर ते पुन्हा परत आले आणि जखमी अवस्थेत पडलेल्या मंडले यांच्या अंगावर वाहन घालून त्यांचा मृत्यू निश्चित केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी मृताच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची चौकशी सुरू केली असता कौटुंबिक वादाची बाब समोर आली. प्राथमिक तपासात मृताची पत्नी आणि तिच्या भावावर संशयाची सुई गेली. तपासादरम्यान दोघांनी काही व्यक्तींमार्फत ही हत्या घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून या कटाचे नियोजन सुरू होते, अशीही माहिती तपासातून पुढे आली आहे.
पतीच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याचे लोकेशन संबंधित व्यक्तींना दिले जात असल्याचेही तपास यंत्रणांना आढळून आले आहे. अपघाताचा बनाव करून हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
या प्रकरणी मृताची पत्नी आणि तिचा भाऊ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्या आणि वाहन चालवणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. कराड शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
अवघ्या 12 तासांत अपघाताचे गूढ उकलून खुनाचा कट उघड करणाऱ्या पोलिसांच्या कारवाईची परिसरात चर्चा होत असून, या प्रकरणातील पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.