जळगाव: जळगाव रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या सतर्कतेमुळे एका तोतया महिला पोलिसाचा बनाव उघडकीस आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाची (RPF) वर्दी परिधान करून स्थानक परिसरात वावरणाऱ्या तरुणीला चौकशीनंतर ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासात तिने लग्नासाठी स्वतःची प्रतिमा प्रभावी दिसावी, यासाठी ही वर्दी परिधान केल्याची माहिती समोर आली आहे.
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त जळगाव रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. यावेळी आरपीएफच्या पथकाला एक तरुणी संशयास्पद हालचाली करताना दिसली. तिच्या अंगावर आरपीएफचा गणवेश असल्याने सुरुवातीला ती कर्मचारी असल्याचा भास होत होता. मात्र, चौकशीदरम्यान ती समाधानकारक माहिती देऊ शकली नाही.
तिने स्वतःला नाशिक येथे कार्यरत आरपीएफ कर्मचारी असल्याचे सांगितले. मात्र, ओळखपत्र मागितल्यावर तिच्याकडे कोणतेही अधिकृत दस्तऐवज नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आरपीएफने नाशिक कार्यालयाशी संपर्क साधून पडताळणी केली असता, संबंधित तरुणीचा दलाशी कोणताही संबंध नसल्याचे उघड झाले.
सखोल चौकशीत ती जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथील रहिवासी असल्याचे समोर आले. तपासादरम्यान तिच्याकडून काही संशयास्पद आणि बनावट कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. यापूर्वीही तिने महाराष्ट्र पोलिसांचा गणवेश घालून छायाचित्रे काढल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
या प्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिने पोलिसाची खोटी ओळख वापरून कोणाची फसवणूक केली आहे का किंवा या कृत्यामागे आणखी काही हेतू होता का, याचा तपास सुरू आहे. आरपीएफचे पोलीस निरीक्षक ए. के. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली.