जुगल पाटील. प्रतिनिधी. जळगाव: जामनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फत्तेपूरजवळील कसबा पिंपरी येथे सततच्या त्रासाला कंटाळून एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या मद्यपी मुलाच्या डोक्यात दगड टाकून निर्घृणपणे हत्या केली. मुलाची हत्या केल्यानंतर, जन्मदात्या बापाने त्याचा मृतदेह एका निर्जन रस्त्यावर टाकून तो अपघात किंवा बाहेरील व्यक्तीचे कृत्य असल्याचे भासवण्याचा प्रयत्न समोर आला आहे. मृत मुलाचे नाव शुभम सुरडकर (वय: 25) असे होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मद्यपान करण्याचे व्यसन ठरले जीवघेणे:
जामनेर तालुक्यातील कसबा पिंपरी येथे धनराज सुपडू सुरडकर हे आपल्या पत्नी, शुभम आणि गौरव या दोन मुलांसह राहतात. त्यांचा मोठा मुलगा शुभम सुरडकर विवाहित होता, परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्याला दारूचे प्रचंड व्यसन होते. चार दिवसांपूर्वी शुभमच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. शुभम दारू पिऊन घरातील प्रत्येकाशी नेहमी वाद घालत होता. ज्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून वडील धनराज सुरडकर यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी शनीवारी रात्रीच्या सुमारास शुभमच्या डोक्यात मोठा दगड टाकून निर्घृणपणे हत्या केली.
खुनाचा बनाव करण्याचा प्रयत्न:
शुभमचा खून केल्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी वडील धनराज सुरडकर आणि त्यांचा लहान मुलगा गौरव सुरडकर यांनी मिळून शुभमचा मृतदेह मध्यरात्री फत्तेपूर-पिंपरी येथील निर्जन बायपासवर आणून टाकला. कुणीतरी बाहेरच्या व्यक्तीने खून केल्याचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
गुन्ह्याचा छडा लागला कसा?
धनराज सुरडकर यांनी संतापात शुभमच्या डोक्यात दगड घातल्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडून मृतावस्थेत दिसला. हे पाहून भेदरलेल्या धनराज यांनी गावात राहणाऱ्या हिरालाल सुपडू सुरडकर या आपल्या चुलत भावाला बोलावून घेत घडलेला प्रकार सांगितला. परंतु, हिरालाल यांनी घाबरून या घटनेबाबत कुणाला काहीही सांगितले नाही.
तिघांना घेतले ताब्यात:
शुभमचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉडच्या तपासानंतर पोलिसांचा संशय कुटुंबीयांवरच वाढला. तपास अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी घराची तपासणी केली असता, खुनाचा सर्व प्रकार स्पष्ट झाला. या प्रकरणी धनराज सुरडकर, मुलगा गौरव सुरडकर आणि काका हिरालाल सुरडकर या तिघांना अटक करण्यात आली असून फत्तेपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.