कल्याण शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलांना चांगले संस्कार देण्याऐवजी काही वडील त्यांच्याकडून थेट घरफोड्या करवून घेत असल्याचं उघड झालं आहे. महात्मा फुले पोलिसांनी उघड केलेल्या या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं असून, त्यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
कल्याण पश्चिमेतील मोहने परिसरात काही दिवसांपूर्वी एका बंद घरात चोरी झाली होती. घरमालकाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांची हालचाल आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांच्या हाती दोन अल्पवयीन मुलं लागली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र चौकशीदरम्यान त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश झाला. या प्रकरणात कैलास भालेराव या 19 वर्षीय तरुणासह त्याचे वडील विलास भालेराव आणि दुसऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील दीपक जाधव यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस तपासात समोर आलेली माहिती अधिक धक्कादायक आहे. आरोपी वडील परिसरात साफसफाई आणि बिगारीची कामं करत होते. या कामांच्या निमित्ताने ते विविध भागात फिरत असत. याच दरम्यान कोणती घरं बंद आहेत, कुठे लोक बाहेरगावी गेले आहेत, याची माहिती ते गोळा करत होते. त्यानंतर आपल्या मुलांना त्या घरांमध्ये पाठवून चोरी करवून घेत असल्याचं उघड झालं आहे.
मुलांना घरात कसं शिरायचं, कुलूप कसं तोडायचं, चोरीनंतर कोणत्या मार्गाने पळून जायचं, तसेच चोरलेला माल कुठे लपवायचा याचंही प्रशिक्षण दिलं जात असल्याचं तपासात समोर आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन मुलाविरुद्ध यापूर्वीही तब्बल १२ चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
चोरीतून मिळालेल्या पैशांत मुलं मौजमस्ती करत होती, तर दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू आरोपी वडिलांकडे जमा केल्या जात होत्या. या टोळीने कल्याण आणि आसपासच्या भागात आणखी किती चोरीच्या घटना केल्या आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.