Ashok Kharat Case: महिलांची फसवणूक, लैंगिक अत्याचार आणि जादूटोणा अशा गंभीर गुन्ह्यांत अडकलेला भोंदू बाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपली. त्यानंतर त्याला नाशिक न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, तपासाचे गांभीर्य आणि त्याच्या जीविताला असलेला संभाव्य धोका लक्षात घेता, त्याला पुन्हा पोलीस कोठडीत घेण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून तातडीने सुरू करण्यात आली आहे.
सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि सुरक्षेचा गंभीर मुद्दा
सहाव्या गुन्ह्याच्या तपासासाठी खरात गेल्या तीन दिवसांपासून पोलीस कोठडीत होता. आज सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. खरातला जेलमध्ये ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते, असा युक्तिवाद त्यांनी केला. त्याच्या जीवाला असलेला धोका आणि प्रकरणातील तपासाचे सातत्य राखण्यासाठी त्याला पुढील गुन्ह्यासाठी तातडीने पोलिसांच्या स्वाधीन करावे, अशी मागणी सरकारी पक्षाने लावून धरली आहे.
सातव्या गुन्ह्यात SIT घेणार खरातचा ताबा
अशोक खरातवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची साखळी दिवसेंदिवस मोठी होत आहे. आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) सातव्या गुन्ह्याचा तपास हाती घेतला आहे. न्यायालयाने खरातला न्यायालयीन कोठडी दिली असली, तरी SIT ने सातव्या गुन्ह्याच्या सखोल चौकशीसाठी त्याचा ताबा मिळवण्याकरिता न्यायालयात रीतसर अर्ज दाखल केला आहे. यामुळे खरातची रवानगी जेलमध्ये होण्याऐवजी त्याला आजच पुन्हा पोलीस कोठडीत घेतले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा - Buldhana Crime : बुलढाण्यात किरकोळ कारण तरुणाच्या जीवावर बोतलं! लग्नात नाचताना घडलं असं काही अन्....
न्यायाधीशांसमोर खरातची कबुली; पीडितांचा आकडा वाढला
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी खरातला "तुझी पोलिसांविरुद्ध काही तक्रार आहे का?" असा प्रश्न विचारला, त्यावर त्याने "नाही" असे उत्तर दिले. अशोक खरात विरोधात दररोज नवनवीन पुरावे आणि पीडित महिला समोर येत आहेत. या प्रकरणाच्या सातव्या गुन्ह्यातून नेमके कोणते धक्कादायक खुलासे होणार आणि भोंदूगिरीचे हे जाळे किती खोलवर पसरले आहे, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.