Chhattisgarh Shocker: छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 20 वर्षीय तरुणाने आपल्या प्रेयसीसमोर प्रेम सिद्ध करण्याच्या प्रयत्नात विष प्राशन केले. हा तरुण प्रेयसीला तिच्या घरी भेटण्यासाठी गेला होता. यावेळी प्रेयसीने आग्रह केल्यामुळे त्याने विष प्राशन केले. या घटनेनंतर त्याची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर त्याला ताबडतोब कोरबा शहरातील मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, 8 ऑक्टोबर रोजी तरुणाचा मृत्यू झाला.
कोरबा जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीश सिंह ठाकूर यांनी सांगितले की, लेमरू पोलीस स्टेशन परिसरातील देवपहाडी गावातील कृष्ण कुमार पांडो या तरुणाने 25 सप्टेंबर रोजी विष प्राशन केले. त्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी तरुणाचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी कृष्ण कुमार पांडोने आपल्या कुटुंबीयांना सांगितले होते की तो एका तरुणीवर प्रेम करतो. प्रेम सिद्ध करण्यासाठी त्याने विष प्यायलं.
हेही वाचा - Scam in Azamgarh Jail: तुरुंगातून सुटताचं कैद्याने केला गेम! तुरुंगाच्या अधिकृत खात्यातून चोरले तब्बल 30 लाख रुपये
पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या कुटुंबीयांनी त्याला जवळच्या गावातील त्यांच्या घरी बोलावले आणि प्रेम सिद्ध करण्यासाठी विष पिण्याचा आग्रह केला. कृष्ण कुमार पांडोने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून विष प्राशन केले. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी सुरू केली असून मृत्यूच्या कारणासह इतर सर्व पैलूंनी तपास सुरू केला आहे.
हेही वाचा - West Bengal: दुर्गापूर हादरलं! वैद्यकीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; नराधमाने जंगलात ओढत नेऊन केलं घृणास्पद कृत्य
सदर प्रकरणामुळे स्थानिक परिसरात चिंता आणि धक्कादायक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. तथापी, प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांचा तपासही पोलीस करत आहेत. ही घटना प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या घातक परिणामांचे उदाहरण ठरली असून, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.