नवी मुंबईतील खारघर परिसरात ‘गोल्डनमॅन’ म्हणून ओळख असलेल्या एका व्यावसायिकाला त्याच्याच जिवलग मित्राने फसवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 57 तोळे सोन्याचे दागिने लुटण्यासाठी आरोपींनी आखलेला कट आणि त्यानंतर पोलिसांनी केलेली तपासाची कारवाई सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणात खारघर पोलिसांनी सात जणांना अटक केली असून मोठ्या प्रमाणात मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. खारघरमध्ये राहणारे सुशांत मोरे हे नेहमी अंगावर मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने परिधान करत असल्यामुळे परिसरात ‘गोल्डनमॅन’ म्हणून प्रसिद्ध आहेत. काही दिवसांपूर्वी ते मित्रांसोबत बेलापूर येथे जेवणासाठी गेले होते. रात्री उशिरा ते घरी परतत असताना त्यांच्या वाहनचालकाकडे असलेल्या दागिन्यांच्या पिशवीवर अचानक तिघांनी हल्ला केला. चाकूचा धाक दाखवत त्यांनी सोन्याने भरलेली पिशवी हिसकावून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेनंतर खारघर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सुरुवातीला पोलिसांच्या संशयाची सुई मोरे यांचा जवळचा मित्र अभिनंदन माळी याच्याकडे वळली. मात्र, “तो माझा विश्वासू मित्र आहे,” असे सांगत मोरे यांनी त्याच्यावर विश्वास व्यक्त केला होता. तरीदेखील पोलिसांनी विविध तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि हालचालींचा तपास सुरूच ठेवला. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. अभिनंदन माळी याने गेल्या वर्षभरात मोरे यांचा विश्वास जिंकत त्यांच्या हालचालींची माहिती मिळवली होती. त्यानंतर त्याने पत्नी कोमल माळी, मेव्हणा वैभव माळी आणि इतर साथीदारांसोबत मिळून लुटीचा संपूर्ण कट रचल्याचे उघड झाले. दरोड्यानंतर आरोपी वेगवेगळ्या भागांत लपून बसले होते. मुख्य आरोपी राहुल माळी आणि हर्षद सागरे हे पोलिसांच्या नजरेतून बचाव करण्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तसेच तेलंगणामध्ये फिरत होते.
विशेष म्हणजे, संशय टाळण्यासाठी ते बाळूमामांच्या पालख्यांसोबत प्रवास करत असल्याची माहिती तपासात समोर आली. अखेर पोलिसांनी सापळा रचत 7 मे रोजी त्यांना अटक केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी सोन्याचे दागिने, कार, दुचाकी, चाकू आणि बनावट पिस्तूल असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त प्रशांत मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्यासह खारघर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. मित्रानेच विश्वासघात करून लुटीचा कट रचल्यामुळे या घटनेची परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, ‘गोल्डनमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीला जवळच्या मित्राकडूनच फसवणूक झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.