कौटुंबिक वादाचा दुर्दैवी शेवट! पत्नी दारात…पतीचा बाल्कनीतून निसटण्याच्या प्रयत्न; पाय घसरला अन् 21 व्या मजल्यावरून थेट…

हर्षित लवानिया असे मृत तरुणाचे नाव असून, या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात आणि त्याच्या कुटुंबियांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.
कौटुंबिक वादाचा दुर्दैवी शेवट! पत्नी दारात…पतीचा बाल्कनीतून निसटण्याच्या प्रयत्न; पाय घसरला अन् 21 व्या मजल्यावरून थेट…
Greater Noida balcony 21st floor fall death

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा शहरातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून निर्माण झालेल्या तणावातून एका तरुणाने थेट 21 व्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली उतरण्याचा किंवा पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र यादरम्यान पाय घसरल्यामुळे खाली पडून त्याचा जागीच करुण अंत झाला आहे. हर्षित लवानिया असे मृत तरुणाचे नाव असून, या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात आणि त्याच्या कुटुंबियांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.

दरवाजा उघडण्यास नकार

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षित लवानिया याचा विवाह 2024 मध्ये झाला होता. मात्र, लग्नाला काही महिने लोटल्यानंतर पती-पत्नीमध्ये खटके उडू लागल्याने त्यांच्यात वारंवार वाद होऊ लागले होते. या सततच्या कौटुंबिक कलहामुळे हर्षित हा ग्रेटर नोएडाच्या सेंच्युरियन पार्क ट्रॉपिकल गार्डनर सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता, तर त्याची पत्नी वेगळी राहत होती. दरम्यान, सोमवारी (12 ऑक्टोबर) संध्याकाळी हर्षितची पत्नी त्याच्या फ्लॅटवर पोहोचली. तिला पतीसोबत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करायची होती, परंतु हर्षितला तिच्याशी बोलण्याची इच्छा नव्हती. दरवाजात पत्नी उभी असल्यामुळे पुन्हा वाद होईल या भीतीपोटी त्याने घराचा दरवाजा उघडण्यास साफ नकार दिला.

बाल्कनीतून खाली उतरताना झाला अनर्थ

हर्षित दरवाजा उघडत नसल्यामुळे अखेर त्याच्या पत्नीने सोसायटीच्या सुरक्षारक्षकांना सोबत घेतले आणि ती पुन्हा फ्लॅटच्या दाराशी आली. बाहेर सुरक्षारक्षक आणि पत्नी उभी असल्याचे पाहून घाबरलेल्या हर्षितने आतून बाहेर जाण्यासाठी थेट बाल्कनीचा मार्ग निवडला. बाल्कनीतून लटकून खालच्या मजल्यावर जाण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र याच थरारक प्रयत्नात त्याचा तोल गेला आणि अचानक पाय घसरून तो थेट 21 व्या मजल्यावरून खाली जमिनीवर कोसळला. या भीषण अपघातात हर्षित गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच सोसायटीमधील इतर रहिवाशांनी तातडीने धाव घेत त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

हेही वाचा – मन सुन्न करणारी घटना! मुंबईत 10 वर्षाच्या मुलीने 18 महिन्यांचा बाळाला इमारतीवरुन फेकले; कारण काय?

पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या मानसिक तणावामुळे आणि घरगुती कलहामुळे हर्षित प्रचंड नैराश्यात होता, अशी माहिती त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस सध्या सर्व बाजूने कसून तपास करत आहेत. हर्षितच्या पत्नीची आणि नातेवाईकांची कसून चौकशी केली जात असून, सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेले फुटेज देखील तपासले जात आहे. नेमक्या कोणत्या परिस्थितीत हर्षित बाल्कनीतून खाली पडला, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version