Sharpshooters Killed in Police Encounter : एका उद्योगपतीच्या घराबाहेर पोलीस आणि शार्पशूटर्स यांच्यात गुरुवारी रात्री थरारक चकमक उडाली. या भागात 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी काही शार्पशूटर्स येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या गुन्हे शाखेला आधीच मिळाली होती, ज्यामुळे पथकांनी परिसरात कडक सापळा रचला होता. रात्री सुमारे 9.50 वाजता संशयित आरोपी एका स्कॉर्पिओ गाडीतून तिथे पोहोचले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून वाहनाचा नंबर लपवण्यासाठी त्यांनी नंबर प्लेटवर काळी टेप लावली होती. पोलिसांनी गाडी पाहताच आरोपींना तात्काळ शरण येण्यास सांगितले; मात्र, त्यांनी थेट पोलिसांच्या दिशेनेच गोळीबार सुरू केला. हरियाणातील गुरुग्रामच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सुशांत लोक परिसरात ही घटना घडली.
60 हून अधिक गोळ्यांचा वर्षाव आणि 2 मिनिटांचे घमासान
आरोपींनी पोलिसांवर गोळी झाडल्यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आणि दोन्ही बाजूंनी सुमारे 2 मिनिटे जोरदार चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन्ही बाजूंनी मिळून एकूण 60 हून अधिक राऊंड फायर झाले, ज्यामध्ये आरोपींनी त्यांच्याकडील स्वयंचलित PX 30 पिस्तुलांमधून तब्बल 40 गोळ्या झाडल्या होत्या. हा निवासी भाग असून तेथे नागरिकही असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनाही चोख प्रत्युत्तर देणे भाग पडले. या भीषण गोळीबारात तीन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
4 शार्पशूटर्स ठार; एका 17 वर्षीय खेळाडूचाही समावेश
या चकमकीत पोलिसांनी 4 शार्पशूटर्सना जागीच ठार केले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये दीपा उर्फ संदीप (वय 35), नितीन (वय 22), अंकित (वय 18) आणि एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे ठार झालेला अल्पवयीन आरोपी हा त्याच्या शाळेच्या भालाफेक (Javelin Throw) संघाचा खेळाडू होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या चकमकीत शिवम नावाचा आणखी एक आरोपी गंभीर जखमी झाला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले आहे.
यूकेमधील गँगस्टरच्या इशाऱ्यावर उद्योगपतीच्या घरावर हल्ला
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या संपूर्ण हल्ल्याची सूत्रे यूके (UK) मध्ये बसलेल्या दीपक नंदाल नावाच्या गँगस्टरने हलवली होती. त्याने १० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी या शार्पशूटर्सना उद्योगपतीच्या हत्येच्या आणि धमकावण्याच्या उद्देशाने पाठवले होते. पोलिसांशी चकमक होण्यापूर्वी आरोपींनी उद्योगपतीच्या घराच्या आवारातील गाड्या, पहिल्या मजल्यावरील बाल्कनी आणि खिडक्यांवर बेछूट गोळीबार केला होता. सुदैवाने, गोळीबाराच्या वेळी उद्योगपतींचे सर्व कुटुंबीय घरात हजर असूनही कोणालाही दुखापत झाली नाही आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.