हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील वडद येथे शेतीच्या वादातून पुतण्याने काका आणि काकूची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, वडद येथील चोपडे कुटुंबात शेतातील सामाईक विहिरीच्या पाणी वाटपावरून आणि शेतीच्या मालकीवरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादातून रविवारी सकाळी वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.आरोपी पुतण्या देवेंद्र चोपडे याने रागाच्या भरात काका त्र्यंबक चोपडे आणि काकू मंगलाबाई चोपडे यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी देवेंद्र चोपडे याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे वडद गावासह संपूर्ण औंढा नागनाथ तालुक्यात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर-
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.