Thursday, June 11, 2026 09:25:14 PM

Crime News: भयंकर! सिगारेटसाठी 7 रुपये मागितले, तरुणाने रागाच्या भरात दुकानदाराच्या बोटाचा दाताने पाडला तुकडा

बिल्हौर शहरात एका तरुणाने सिगारेटच्या अवघ्या दोन रुपयांच्या वादातून दुकानदारावर हिंसक हल्ला केला.

crime news भयंकर सिगारेटसाठी 7 रुपये मागितले तरुणाने रागाच्या भरात दुकानदाराच्या बोटाचा दाताने पाडला तुकडा

Kanpur Crime: उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिल्हौर शहरात एका तरुणाने सिगारेटच्या अवघ्या दोन रुपयांच्या वादातून दुकानदारावर हिंसक हल्ला केला. रागाच्या भरात या तरुणाने दुकानदाराचे बोट दाताने इतक्या जोरात चावले की, बोटाचा तुकडा थेट जमिनीवर पडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमका वाद काय होता?
मिळालेल्या माहितीनुसार, बिल्हौरच्या गोल मार्केट परिसरातील महाराणा प्रताप नगर येथे राहणारा दीपू हा अंडी आणि बेकरीचे दुकान चालवतो. रविवारी सकाळी एक तरुण त्याच्या दुकानात सिगारेट खरेदी करण्यासाठी आला होता. सिगारेट ओढल्यानंतर 7 रुपये देणे अपेक्षित असताना, त्या तरुणाने केवळ 5 रुपये देण्याचा हट्ट धरला. उरलेल्या 2 रुपयांवरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले.

हाणामारी आणि क्रूर कृत्य
सुरुवातीच्या वादानंतर तो तरुण तिथून निघून गेला, मात्र काही वेळाने पुन्हा दुकानात परतला. त्याने दुकानदाराला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता, संतापलेल्या आरोपीने दीपूच्या डाव्या हाताच्या बोटाचा कडाडून चावा घेतला. हा हल्ला इतका भयानक होता की, दीपूच्या बोटाचा एक भाग शरीरापासून वेगळा होऊन जमिनीवर पडला.

हेही वाचा - Gondia Crime : धक्कादायक! अल्पवयीन मुलीची प्रसूती, बाळाची केली थेट विक्री; डॉक्टरवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

आरोपी पोलिसांच्या ताब्यात
बोट कापले गेल्याने दीपू वेदनेने विव्हळू लागला आणि त्याच्या हातातून प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाला. त्याचा आवाज ऐकून परिसरातील इतर दुकानदार आणि नागरिक मदतीसाठी धावून आले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला जमावाने पकडून बेदम चोप दिला आणि तातडीने पोलिसांच्या स्वाधीन केले. जखमी दुकानदाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
 


सम्बन्धित सामग्री