पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. 3 ऑक्टोबर रोजी, शनिवारी इंदापूरजवळ गलांडवाडी नंबर 1 येथे ही दुर्घटना घडली. मैलाच्या दगडाला वेरना कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की, कार रस्त्यावर पलटी झाली.
या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कारमधील सर्वजण सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या अपघाताचा थरारक क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यामध्ये कार पलटी होताना स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकरणी इंदापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, बारामती-भिगवण रोडवरही भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मिलिंद ट्रेडिंग कंपनीसमोर हा अपघात झाला. भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
अपघातामुळे बारामती-भिगवण रोडवर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी बारामती शहर पोलीस अधिक तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीद्वारे अपघाताचा नेमका तपास केला जात आहे.
घडलेल्या या दोन भीषण अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, महामार्गावर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.