NEET Paper Leak Case: देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता निर्णायक वळणावर आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील 'जमवा रामगढ' येथून दिनेश बिवाल आणि त्याचा भाऊ मंगिलाल बिवाल या दोन सख्ख्या भावांना अटक केली आहे. आरोपी दिनेश हा भाजप युवा मोर्चाच्या जयपूर ग्रामीण विभागाचा जिल्हा सचिव म्हणून कार्यरत असून, त्याने 10 विद्यार्थ्यांना 'गेस पेपर्स' विकल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
15 लाखांना विकत घेतला 'गेस पेपर'; रोख रकमेत व्यवहार
राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने (SOG) दिलेल्या माहितीनुसार, दिनेश आणि मंगिलाल यांनी हरियाणातील 'यश' नावाच्या व्यक्तीकडून NEET-2026 चा 'गेस पेपर' (ज्यामध्ये 120 प्रश्न होते) 15 लाख रुपयांना विकत घेतला होता. स्वतःची ही आर्थिक गुंतवणूक वसूल करण्यासाठी दिनेशने हे पेपर्स सीकरमधील अनेक विद्यार्थ्यांना विकले आणि त्यांच्याकडून रोख स्वरूपात मोठी रक्कम स्वीकारली. हरियाणातील आरोपींकडून पेपर स्वीकारताना या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
एकाच कुटुंबातील 5 मुले एकाच वेळी उत्तीर्ण; CBI ला संशय
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दिनेश बिवालच्या कुटुंबातील पाच उमेदवारांनी गेल्या वर्षी एकाच वेळी NEET परीक्षा उत्तीर्ण केली होती. यामध्ये दिनेशचा मुलगा, मंगिलालचे दोन मुलगे आणि त्यांच्या दिवंगत मोठ्या भावाच्या दोन मुलींचा समावेश आहे. हे पाचही जण सध्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. एकाच कुटुंबातील पाच जणांनी एकाच वेळी यश मिळवल्यामुळे तपास यंत्रणांचा संशय बळावला असून, या मागील गैरव्यवहाराचा शोध आता CBI घेत आहे.
आरोपींची रवानगी दिल्लीकडे
SOG ने प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर, आज सकाळी CBI ने अधिकृतपणे या दोघांना अटक केली. या प्रकरणातील धागेदोरे दिल्ली आणि हरियाणापर्यंत जोडलेले असल्याने, पुढील सखोल चौकशीसाठी CBI सर्व आरोपींना घेऊन दिल्लीला रवाना झाली आहे. या अटकेमुळे पेपरफुटीच्या आंतरराज्य रॅकेटमधील आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.