Crime News: तेलंगणातील हनुमकोंडा जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलाच्या हव्यासापोटी एका नराधम पतीने आपल्या गर्भवती पत्नीसह दोन निष्पाप मुलींची स्विमिंग पूलमध्ये बुडवून संपवलं. अझहरुद्दीन असे या आरोपीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, आरोपी आणि पीडित महिला यांचा प्रेमविवाह झाला होता, मात्र वंशाच्या दिव्याच्या हव्यासापायी या नात्याचा असा भयानक शेवट झाला.
पत्नीचा गर्भपाताला विरोध आणि पूर्वनियोजित कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अझहरुद्दीनच्या पत्नीला तिसऱ्यांदा गर्भधारणा झाली होती. मात्र, पोटात वाढणारे बाळ पुन्हा मुलगीच असेल, अशी भीती अझहरुद्दीनला वाटत होती. त्याने पत्नीवर गर्भपात करण्यासाठी वारंवार दबाव टाकला, परंतु पत्नीने त्याला ठामपणे नकार दिला. याच रागातून अझहरुद्दीनने कुटुंबाचा काटा काढण्याचा क्रूर कट रचला. त्याने आपल्या कुटुंबाला एका स्विमिंग पूलवर नेले आणि तिथे संधी मिळताच पत्नी व दोन मुलींना पाण्यात ढकलून दिले. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फरार अझहरुद्दीनला पकडण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
लग्नास नकार दिला म्हणून तरुणीला टोचले 'HIV' बाधित रक्त
दरम्यान, तेलंगणातीलच मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्यात एका दुसऱ्या घटनेत सूडाची एक विकृत मानसिकता पाहायला मिळाली. कोलीपाका मनोहर (25) नावाच्या तरुणाने एका महिलेने लग्नास नकार दिल्यामुळे संतापून, स्वतःचे HIV-बाधित रक्त इंजेक्शनद्वारे त्या महिलेच्या शरीरात टोचले. महिलेला संपवण्याच्या उद्देशानेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा - Registrar Office Raid: 1 कोटी 23 लाखांचे दागिने, 25 लाख रुपयांची रोकड...; उपनिबंधक कार्यालयात कोट्यवधींचा खजिना उघडकीस
आरोपीला पोलीस कोठडी, पीडितेच्या वडिलांची तक्रार
पीडित महिलेचे वडील चिरंजीवी यांनी पोचारम पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत अन्नोजिगुडा परिसरातून मनोहरला अटक केली. एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या मनोहरवर 'भारतीय न्याय संहिता' (BNS) च्या कलम 109 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एकापाठोपाठ घडलेल्या या दोन क्रूर घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.