वर्षा मोरे, प्रतिनिधी
अकोला : तुम्हाला व्हाट्सॲपवर अकोला महापालिकेच्या लोगोसह 10 रुपये भरून पाणी बिल अपडेट करा, नाहीतर पाईपलाईन तोडणार' असा मेसेज आला, तर लगेच सतर्क व्हा. कारण, अकोल्यात सायबर गुन्हेगारांनी 3 जणांना गंडवून बँकेतून लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे. एका महिलेच्या स्टेट बँकेच्या खात्यातून एक लाख सात हजार रुपये लंपास केले आहेत. हा फसवणुकीचा प्रकार अकोल्यातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत घडला. तसेच अन्य दोन जणांना अशाच पद्धतीने गंडवण्यात आले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा : Tirupati Prasad: तिरुपती लाडू घोटाळा! प्रसिद्ध प्रसादात ‘केमिकल तूप’, सीबीआयच्या तपासात 250 कोटींचा फसवणुकीचा पर्दाफाश
व्हॉट्सॲपवर 7583891729 या क्रमांकावरून मेसेज आला असल्याचे समजते. या मेसेजवर अकोला महापालिकेचा लोगो वापरलेला होता. 'तुमचं मागील महिन्याचं पाणीकर बिल भरलेले नाही, त्यामुळे पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन तोडण्यात येईल,' अशी स्पष्ट धमकी मेसेजमध्ये देण्यात आली होती. यासोबतच, हा मेसेज खरा वाटावा म्हणून 'पाणीपुरवठा पाईपलाईन अधिकारी' म्हणून देवेश जोशी नावाच्या व्यक्तीचा मोबाइल नंबरही दिला होता.
रत्नाकला भगत यांनी व्हाट्सॲपवर आलेला मेसेज वाचल्यानंतर 'मी तुम्हाला लगेच बिल पाठवतो, पण त्याआधी तुम्ही फक्त 10 रुपये ऑनलाइन व्यवहाराद्वारे टाका', असे सांगितले. महिलेने ऑनलाइन 10 रुपये भरताच दोन ट्रान्झॅक्शन झाले. पहिले ट्रान्झॅक्शन 65 हजार 663 रुपये तर दुसरे 35 हजार रुपयांचे. अशाप्रकारे हे सायबर गुन्हेगार फसवणूक करत आहेत, अशी माहिती फसवणूक झालेल्या रत्नाकला भगत यांनी दिली.