बांगलादेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका निवृत्त शिक्षकासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारून मारेकऱ्यांनी त्याच घरात जेवण आणि आंघोळ केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. बांगलादेशच्या रंगपूर शहरात घराच्या छतावर नशा करणाऱ्यांना रोखल्यामुळे ही घटना घडली. पोलीस कमिशनर मोहम्मद अब्दुल माबूद यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशच्या रंगपूर शहरात 65 वर्षीय गणपती चक्रवर्ती या निवृत्त शिक्षकाच्या बांधकाम सुरू असलेल्या घराच्या दुसऱ्या मजल्याच्या छतावर दोन अज्ञात व्यक्ती याबा नावाच्या पदार्थाची नशा करत होते.
याबाबतची माहिती गणपती यांना मिळताच ते छतावर पाहणी करण्यासाठी गेले. आणि दोघांना रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोघांनी टॉवेलने गणपती यांचा गळा आवळला. गणपती यांचा आवाज ऐकून त्यांची पत्नी प्रीतिलता चक्रवर्ती (50) देखील छतावर गेली. त्यानंतर नराधमांनी तिला देखील जीवे मारले.
यानंतर हे नराधम इथवर थांबले नाही. त्यांनी गणपती यांच्या मुलीची आगामी चक्रवर्ती प्रार्थी (23) आणि मुलगा प्रियम चक्रवर्ती (12) यांची देखील हत्या केली. या चौघांचे मृतदेह शनिवारी त्यांच्या राहत्या घरात मिळाले. यानंतर अख्ख कुटुंब संपवल्यानंतर आरोपींनी गणपती यांच्या घरातच आंघोळ केली इतकचं नव्हे तर फ्रीजमधून खजूर आणि काकडी खाल्ले. तसंच त्यांनी घरातील सामानही अस्थाव्यस्थ केलं, ज्यामुळे चोरीच्या उद्देशातून हत्या झाल्याचं वाटेल.
यानंतर पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर सिद्धार्थ दास आणि मुग्धा दास यांना अटक केली. दोघं नातेवाईक असून ते गणपतीच्या घराजवळ राहायचे अशी प्रथमिक माहिती पोलिसांनी दिली. यावेळी पोलिसांना आरोपींकडून घरात वापरल्या जाणाऱ्या गोष्टी मिळाल्या, याशिवाय एक सोन्याच्या बांगडी आणि कुटुंबातील सदस्यांचे मोबाईल फोन सापडले. पुरावे नष्ट करण्यासाठी हे फोन आरोपींनी डिटर्जंटच्या पाण्यात बुडवले. पण याच पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सिद्धार्थ दास आणि मुग्धा दास यांना पकडलं. दरम्यान बांगलादेशच्या रंगपूर शहरात झालेल्या या घटनेमुळे एकच खळबल उडाली आहे.