Malad Professor Death Case: मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये केवळ धक्काबुक्कीच्या कारणावरून एका 33 वर्षीय प्राध्यापकाला संपवण्यात आलं. प्राध्यापकाला संपवणाऱ्या आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आलोक कुमार सिंह असे मृत प्राध्यापकाचे नाव असून, याप्रकरणी बोरीवली जीआरपीने आरोपी ओमकार शिंदेला बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण घटनेचा अंगावर शहारे आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे.
नेमका वाद कशावरून झाला?
आलोक कुमार सिंह हे एका खाजगी महाविद्यालयात कार्यरत होते. संध्याकाळी घरी परतत असताना मालाड स्टेशन येण्यापूर्वी आरोपी ओमकार शिंदे आणि आलोक यांच्यात बाचाबाची झाली. गर्दीतून पुढे जाण्यासाठी ओमकार ढकलत होता, मात्र समोर महिला उभी असल्याने आलोक यांनी त्याला धक्का न मारण्याची विनंती केली. या साध्या सुचनेवरून संतापलेल्या ओमकारने त्यांना 'बघून घेण्याची' धमकी दिली.
हेही वाचा - Malad Crime: दारातली धक्काबुक्की जीवावर बेतली, लोकलमधील किरकोळ वादातून तरुणाने थेट चाकूच काढला अन्...
स्टेशनवर काळजाचा ठोका चुकवणारा तो क्षण
मालाड रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही क्रूर घटना स्पष्टपणे कैद झाली आहे. ट्रेन फलाटावर येताच आरोपी ओमकार खाली उतरला. मात्र, तो तिथून गेला नाही. त्याने खिशातून एक टोकदार चिमटा काढला आणि ट्रेनच्या दरवाजात उभे असलेल्या आलोक यांच्या पोटात जोरात खुपसला. हा हल्ला इतका अनपेक्षित आणि वेगवान होता की आलोक यांना काही समजण्यापूर्वीच आरोपीने तिथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या आलोक यांनी 'पकडा-पकडा' असा आक्रोश केला, मात्र गर्दीचा फायदा घेत आरोपी फरार झाला. उपस्थित प्रवाशांनी तातडीने त्यांना स्थानकावर बसवले आणि पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात नेले. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
पोलिसांची कारवाई
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) तातडीने तपास चक्रे फिरवून आरोपी ओमकार शिंदेला अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ प्रवासातील धक्क्यामुळे एका निष्पाप प्राध्यापकाचा जीव गेल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.