Crime News: लंडनमधील साऊथॉल (पश्चिम लंडन) भागात एका 26 वर्षीय भारतीय वंशाच्या तरुणाला चाकूने भोसकून संपवण्यात आलं. गुरभेज सिंग असे मृत तरुणाचे नाव असून या हल्ल्यात अंदाजे 30 वर्षांचा आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमत तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉर्मर्स वेल्स लेनच्या जंक्शनजवळील नॉर्थ रोडवर हा संपूर्ण प्रकार घडला.
घटनास्थळीच तरुणाचा मृत्यू
मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जून रोजी मध्यरात्री 00:41 च्या सुमारास लंडन रुग्णवाहिका सेवेकडून त्यांना या हिंसक घटनेची माहिती मिळाली. पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तेव्हा गुरभेज सिंग हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. पॅरामेडिक्सनी त्याचे प्राण वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाने त्याला घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आले. सिंगसोबत जखमी अवस्थेत सापडलेल्या दुसऱ्या व्यक्तीची ओळख मात्र पोलिसांनी अद्याप गोपनीय ठेवली आहे.
संशयितांची धरपकड आणि सुटका
या हत्येचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळावरून संशयाच्या आधारे 20 ते 30 वयोगटातील 7 जणांना ताब्यात घेतले होते. मात्र, प्राथमिक चौकशीनंतर त्यातील 6 जणांना पुढील कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आणखी एका संशयिताला एका ठराविक तारखेला हजर राहण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत.
प्रत्यक्षदर्शींना पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन
मेटच्या स्पेशालिस्ट क्राइम कमांडच्या डिटेक्टिव्ह चीफ इन्स्पेक्टर ॲलिसन फॉक्सवेल यांनी मृताच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, "आमच्या अंदाजानुसार, रात्री सुमारे 00:30 वाजता नॉर्थ रोड आणि डॉर्मर्स वेल लेन जंक्शनवरील एका दुकानाच्या बाहेर हा हल्ला झाला. ज्यांच्याकडे या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आहे किंवा ज्यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिली आहे, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा." माहिती देणारे 'मेजर इन्सिडेंट इन्फॉर्मेशन पोर्टल'द्वारे ऑनलाईन किंवा 101 वर कॉल करू शकतात. तसेच 0800 555 111 या क्रमांकावर 'क्राइमस्टॉपर्स'ला संपर्क करून आपली ओळख गुप्त ठेवूनही माहिती देता येईल.