जळगावच्या पाळधीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बस पकडताना एका विद्यार्थिनीचा पाय घसरून बसखाली चिरडून मृत्यू झाला. राजनंदिनी शिंदे असे मृत विद्यार्थीनीचे नाव असून ती पाळधी येथील झंवर विद्यालयाची विद्यार्थिनी होती. शाळा सुटल्यानंतर गावाकडे जाण्यासाठी विद्यार्थ्यांची बस पकडण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीत बसमध्ये चढताना राजनंदिनीचा पाय सटकला आणि ती बसखाली आल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे पाळधी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. शाळा सुटल्यानंतर बस पकडण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी ही नेहमी पाहायला मिळते, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच पाळधी गावात दिवसाला फक्त 2 च बसच्या फेऱ्या होत असून त्यात शाळकरी विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची देखील गर्दी होत असते. त्यामुळे वारंवार मागणी करून देखील बसेसची संख्या न वाढवल्यामुळे या घटनेवरून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा – ‘नॅचरल डेअरी’वर FDA ची मोठी कारवाई! तपासणीत गंभीर नियमभंग उघड; परवाना तात्काळ निलंबित
या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासन आता काय उपाय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.