जामनेर तालुक्यातील टाकळी रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये दारू आणि जेवण देण्याच्या कारणावरून मध्यरात्री वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून हॉटेलमधील कर्मचारी आणि चालकाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, हॉटेलच्या दरवाजा आणि खिडकीचेही नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, टाकळी रस्त्यावरील आर्यन हॉटेलमध्ये रात्री काही जण आले होते. दारू आणि जेवण न दिल्याच्या कारणावरून त्यांचा हॉटेलमधील कर्मचाऱ्यांशी वाद झाला. काही वेळातच वाद वाढल्याने संबंधित व्यक्तींनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. या गोंधळात हॉटेलच्या प्रवेशद्वार आणि खिडकीची तोडफोड करण्यात आल्याचेही समोर आले आहे. घटनेदरम्यान राजू लखू पवार हा तरुण जखमी झाला. त्याच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या भागावर धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सीसीटीव्हीत घटना कैद
हॉटेलमध्ये झालेल्या या राड्याची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे.या प्रकरणी कल्पेश माळी, मयूर शिवद आणि मनोहर राऊत या तिघांविरोधात जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही जामनेर येथील रहिवासी असल्याचे तक्रारीत नमूद आहे.