Crime News: कर्नाटकातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सध्या एका गंभीर घटनेने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. तुमकूर ग्रामीण मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश गौडा यांची मुलगी ऐश्वर्या हिने मंदिरात कर्तव्यावर तैनात असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा प्रत्यक्ष सीसीटीव्ही (CCTV) फुटेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्यामध्ये आमदाराच्या मुलीची मुजोरशाही स्पष्टपणे कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही संतापजनक घटना 12 ऑगस्ट रोजी मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध ‘आरती उक्कडा’ मंदिरात घडली. त्या दिवशी ‘भीमाना अमावस्या’ या विशेष धार्मिक विधीनिमित्त मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मंड्या महिला पोलीस ठाण्याच्या अधिकारी सविता बी. पाटील यांची तिथे नियुक्ती करण्यात आली होती. पूजेदरम्यान ऐश्वर्या यांनी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात थेट प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षेचे नियम पाळत सविता पाटील यांनी त्यांना रोखले.
यावरून ऐश्वर्या आणि महिला पोलीस अधिकारी यांच्यात तीव्र शब्दांत बाचाबाची सुरू झाली. वादाचे रूपांतर पाहता पाहता हाणामारीत झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्यानुसार, ऐश्वर्या यांनी अचानक शेजारी उभ्या असलेल्या सविता पाटील यांच्या थेट कानशिलात लगावली. या अनपेक्षित हल्ल्याने संतप्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्यानेही तात्काळ स्वतःचा बचाव करत प्रत्युत्तर दिले. या घटनेमुळे गाभाऱ्यात एकच गोंधळ उडाला आणि उपस्थितांनी मध्यस्थी करून दोघींना एकमेकांपासून वेगळे केले.
या घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक सविता पाटील यांनी श्रीरंगपट्टण येथील क्यातनाहल्ली पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. त्या आधारे पोलीस प्रशासनाने ऐश्वर्या यांच्याविरुद्ध ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) मधील विविध कलमांनुसार शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ करणे आणि हल्ला करणे याप्रकरणी एफआयआर (FIR) नोंदवला आहे. विशेष म्हणजे, ऐश्वर्या यांचे पती स्वतः एक पोलीस अधिकारी आहेत. त्यांनीही या प्रकरणी प्रति-तक्रार दाखल केली असली, तरी पोलीस सध्या तिची कायदेशीर पडताळणी करत आहेत.
Wish the police officer returned the favour on her face!! CCTV footage from August 12 appears to show Karnataka BJP MLA B Suresh Gowda’s daughter Aishwarya slapping woman PSI Savitha Patil at a Mandya temple.. allegedly after being asked to wait just two minutes before entering… pic.twitter.com/kZdC2vBpJz — Nabila Jamal (@nabilajamal_) August 25, 2026
लोकप्रतिनिधीच्या नातेवाइकाने शासकीय कर्तव्यावर असलेल्या महिला अधिकाऱ्यावर अशा प्रकारे हात उचलल्यामुळे कर्नाटक पोलीस दलात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.