Nasrapur Case: भोर तालुक्यातील नसरापूर येथे अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणाचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे (वय 65) याला फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाचा निकाल जाहीर होताच पीडित मुलीच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले, तर न्यायालयात उपस्थित असलेले अनेकजणही भावूक झाले. विशेष म्हणजे, गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 2 महिन्यांत या प्रकरणाचा निकाल लागला असून, राज्यातील जलदगतीने निकाली निघालेल्या महत्त्वाच्या खटल्यांपैकी हा एक ठरला आहे.
दुर्मिळातील दुर्मिळ' गुन्हा; वयाचा आधार नाकारला
निकालपत्राचे वाचन करताना न्यायाधीशांनी आरोपीच्या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. न्यायालयाने हा गुन्हा 'दुर्मिळातील दुर्मिळ' स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट करत, पीडितेच्या शरीरावर 18 गंभीर जखमा आढळल्याचा उल्लेख केला. स्वतःची विकृत वासना पूर्ण करण्यासाठी आरोपीने अत्यंत असहाय्य चिमुरडीवर अत्याचार करून तिला संपवलं. मृत्यूनंतरही तिच्यावर अत्याचार केल्याचे न्यायालयाने नमूद केले. अशा अमानुष कृत्यानंतर आरोपीच्या 65 वर्षांच्या वयाचा कोणताही विचार करून सवलत देण्याचे कारण नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
आरोपीचा गुन्हेगारी इतिहास न्यायालयासमोर
तपासादरम्यान आरोपीचा गंभीर गुन्हेगारी इतिहासही समोर आला. वयाच्या 53 व्या वर्षी त्याने स्वतःच्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची नोंद आहे. याशिवाय एका वृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला तसेच दुसऱ्या महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याचेही त्याच्याविरुद्धचे पूर्वीचे गुन्हे न्यायालयासमोर मांडण्यात आले. या सर्व घटनांवरून आरोपीला कायद्याचा कोणताही धाक नव्हता आणि त्याच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नसल्याचा निष्कर्ष न्यायालयाने नोंदवला.
15 दिवसांत 1200 पानांचे दोषारोपपत्र
या प्रकरणाच्या तपासात पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि प्रभावीपणे काम केले. 1 मे 2026 रोजी घटना घडल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत पोलिसांनी 1200 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. खटल्यादरम्यान एकूण 55 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 12 महत्त्वाच्या निकालांचा आधार घेत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. फॉरेन्सिक, वैद्यकीय आणि सायबर तज्ज्ञांच्या समन्वयातून सादर करण्यात आलेल्या भक्कम पुराव्यांमुळे न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.