Accident News: उत्तर प्रदेशातील कानपूर शहर पुन्हा एकदा एका धक्कादायक अपघातामुळे चर्चेत आले आहे. आलिशान कार, अमाप वेग आणि बेफिकीर वृत्ती यांचा धोकादायक संगम रविवारी दुपारी पाहायला मिळाला. प्रसिद्ध तंबाखू व्यावसायिकाचा मुलगा शिवम मिश्रा याने भरधाव लॅम्बोर्गिनी कार चालवत रस्त्यावर प्रचंड हाहाकार माजवला. या घटनेत सहा जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
रविवारी दुपारी सुमारे ३.१५ वाजता कानपूरमधील ग्वाल्टोली परिसरात, रेव्ह–३ मॉलजवळ हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींनुसार, लाल रंगाची लॅम्बोर्गिनी प्रचंड वेगात होती. अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने आधी एका ऑटो-रिक्षाला धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी, काही वाहनं आणि पादचाऱ्यांना चिरडत कार पुढे गेली. काही क्षणातच परिसरात भीतीचं वातावरण पसरलं.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, गाडी शिवम मिश्राच चालवत असल्याची खात्री झाली. प्राथमिक तपासात तो नशेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस उपायुक्त अतुल कुमार श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना अत्यंत गंभीर असून निष्काळजी वाहनचालना अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे.
कोण आहे शिवम मिश्रा?
शिवम मिश्रा हा उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध तंबाखू व्यापारी के.के. मिश्रा यांचा मुलगा आहे. तो याआधीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. २०२४ मध्ये बंशीधर एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमुळे शिवम मिश्राचं नाव समोर आलं होतं. या चौकशीत कंपनीच्या घोषित उत्पन्नापेक्षा प्रत्यक्ष व्यवहार मोठ्या प्रमाणात जास्त असल्याचे निष्पन्न झाले होते.
तपासादरम्यान कानपूर, मुंबई, दिल्ली आणि गुजरातमधील कार्यालयांमध्ये धाडी टाकण्यात आल्या होत्या. या कारवाईत कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले होते. त्यामुळे शिवम मिश्रा आणि त्याच्या कुटुंबाची संपत्ती, व्यवसाय आणि जीवनशैली यावर देशभरात चर्चा झाली होती.
आलिशान जीवनशैली आणि वाद
मिळालेल्या माहितीनुसार, शिवम मिश्रा दिल्लीतील वसंत विहार परिसरात राहतो. त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांचा आलिशान कार्सचा संग्रह आहे. विशेष म्हणजे, त्याच्या सर्व वाहनांवर एकच विशिष्ट नंबर असल्याचंही समोर आलं आहे. ही झगमगाटी जीवनशैली आणि त्यातून निर्माण होणारी बेफिकिरी आता थेट सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याची टीका होत आहे.