लोहगड किल्ल्यावर होणारा पती केतन अग्रवाल याला दरीत ढकलून ठार मारल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सिया गोयलच्या कुटुंबीयांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांच्या मार्केट यार्डमधील दुकानावर छापा टाकून ते सील केले. यावेळी सुमारे 4,000 किलो निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले असून, त्यांची अंदाजे किंमत 8 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
एफडीएचे अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दुपारच्या सुमारास विभागाच्या पथकाने मार्केट यार्ड परिसरातील दुकानाची तपासणी केली. तपासादरम्यान अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. दुकानातील साठ्याची पाहणी करताना मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आढळून आल्याने ते ताब्यात घेण्यात आले आणि दुकानावर तत्काळ सीलची कारवाई करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दुकान आवश्यक व्यावसायिक परवान्याशिवाय सुरू असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. तपासणीदरम्यान दुकानात परवाना अथवा त्याची प्रत उपलब्ध नव्हती. तसेच, साठवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता अन्नसुरक्षेच्या निकषांनुसार नसल्याचे आढळल्याने ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणी 'अन्न सुरक्षा आणि मानके कायदा' (Food Safety and Standards Act) अंतर्गत संबंधित दुकानदाराविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एफडीएने दिली आहे. तसेच, दुकानदाराला आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पुण्यातील मार्केट यार्ड हे राज्यातील महत्त्वाचे घाऊक व्यापार केंद्र मानले जाते. येथे मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थांची खरेदी-विक्री होत असून, अनेक किरकोळ व्यापारी येथून माल घेऊन राज्यातील विविध भागांत विक्री करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या कारवाईकडे व्यापारी व ग्राहकांचेही लक्ष लागले आहे.