माणुसकीला काळीमा! भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; थांबला नाही.. तसाच पुढे गेला.. आईसह चिमुकल्यांचे मृतदेह 3 किलोमीटरपर्यंत..

अपघाताच्या तीव्रतेमुळे दुचाकी थेट कंटेनरच्या मागच्या चाकात अडकली. मात्र, चालकाने अपघात घडल्यानंतर गाडी थांबवण्याऐवजी ती भरधाव वेगाने पुढे पळवली.
accident
accident

Container Drags Bike 3 km in Mainpuri Accident: उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास एक अतिशय भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा रस्ते अपघात घडला. बेवर परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव कंटेनरने पुढे चाललेल्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी प्राणघातक होती की दुचाकीवरील महिला आणि तिच्या दोन निष्पाप चिमुकल्या मुलींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात दुचाकी चालवणारे चिमुकल्या मुलींचे वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पहाटे सव्वाचारच्या सुमारास कुटुंबावर कोसळला काळाचा घाला
मैनपुरी कोतवाली परिसरातील कछपुरा गावातील निवासी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले 32 वर्षीय बाबी हे सोमवारी संध्याकाळी आपल्या सासरी नगला टांकन येथे गेले होते. मंगळवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास ते आपली पत्नी सुमन, 4 वर्षांची मुलगी प्रियांशी आणि 1 वर्षाची मुलगी दिव्यांशी यांना घेऊन दुचाकीवरून गावी परतण्यासाठी निघाले होते. ते बनकिया गावाजवळ पोहोचले, त्या सुमारास मागून आलेल्या बेदरकार कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरात उडवले.

3 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याने मृतदेहांची विटंबना

अपघाताच्या तीव्रतेमुळे दुचाकी थेट कंटेनरच्या मागच्या चाकात अडकली. मात्र, चालकाने अपघात घडल्यानंतर गाडी थांबवण्याऐवजी ती भरधाव वेगाने पुढे पळवली. या दुचाकीसह तिच्यावर असलेले महिला आणि दोन लहान मुली तब्बल 3 किलोमीटरपर्यंत फरफटत गेल्या, ज्यामुळे मृतदेहांची प्रचंड विटंबना होऊन रस्त्यावर अवशेष पसरले. या फरफटीमुळे भीषण घर्षण निर्माण होऊन दुचाकी आणि कंटेनरला अचानक आग लागली. या कंटेनरमध्ये स्पोर्ट्स शूजने भरलेले होते. त्यामुळे आग वेगाने पसरू लागली.

हेही वाचा – बड्या कंपनीतील कर्मचाऱ्यांवर काळाचा घाला; भरधाव बोलेरोची ट्रेलरला धडक; 6 जणांचा जागीच मृत्यू

आगीच्या भडक्यानंतर चालक फरार; पोलिसांकडून मदतकार्य सुरू
गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच चालक कंटेनर घटनास्थळावरच सोडून अंधाराचा फायदा घेत फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तात्काळ धाव घेतली आणि सुमारे 20 मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी कंटेनरच्या चाकात अडकलेले तिघांचे छिन्नविछिन्न मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी (Post-mortem) पाठवून दिले.

गंभीर जखमी बाबींवर उपचार सुरू; पोलिसांकडून फरार चालकाचा शोध

अपघातात गंभीर जखमी झालेल्या बाबी यांना प्रथम बेवर येथील स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते, परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी अपघातग्रस्त कंटेनर जप्त केला असून फरार चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. एकाच घरातील आईसह दोन चिमुकल्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण मैनपुरी परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा – महामार्गावर थरार! डंपर-कारची थरारक धडक; भीषण अपघातात 4 जणांचा दुर्दैवी अंत, 3 गंभीर जखमी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version