Meta Suicide Alert India : सोशल मीडिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अचूक समन्वयामुळे एका 25 वर्षीय तरुणाचे प्राण वाचल्याची अत्यंत थरारक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंध तुटल्यामुळे आलेल्या तीव्र नैराश्यातून या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र सोशल मीडियाची मातृकंपनी 'मेटा' आणि पोलीस यांच्यातील सतर्कतेमुळे एका रात्रीत मोठा अनर्थ टळला. तरुणाने आत्महत्येचा व्हिडिओ पोस्ट करताच पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्रे फिरवून केवळ 8 मिनिटांत थेट त्याच्या घराचा पत्ता गाठला आणि त्याचे प्राण वाचवले.
इन्स्टाग्राम रीलवर विषाची बाटली आणि भावुक संदेश
ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील सरधना परिसरात राहणाऱ्या एका 25 वर्षांच्या तरुणाचे नुकतेच ब्रेकअप झाले होते. या मानसिक धक्क्यातून आणि नैराश्यातून त्याने 7 जून रोजी इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ रील अपलोड केली. या व्हिडिओमध्ये तो पांढऱ्या रंगाचे एक घातक विषारी द्रव प्राशन करताना दिसत होता, तसेच व्हिडिओच्या बॅकग्राउंडला 'आता तू तुझ्या आयुष्यात सुखी राहा' असा हिंदीत लिहिलेला एक भावुक मेसेज प्रसिद्ध केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच एका मोठ्या जीवरक्षक मोहिमेला सुरुवात झाली.
'मेटा'चा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अलर्ट आणि पोलिसांची हायस्पीड अॅक्शन
तरुणाने हा आत्महत्येचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही सेकंदांत 'मेटा' कंपनीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) प्रणालीने ही संशयास्पद आणि अत्यंत संवेदनशील हालचाल अचूकपणे ओळखली. या प्रणालीने तातडीने त्याच दिवशी संध्याकाळी 6:53 वाजता उत्तर प्रदेश पोलिसांच्या मुख्य सोशल मीडिया सेंटरला एक 'सुसाईड अलर्ट' पाठवला. मेटाकडून मिळालेला मोबाईल क्रमांक आणि अचूक लोकेशन ट्रॅक करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ स्थानिक सरधना पोलिसांना सतर्क केले. माहिती मिळताच सरधना पोलीस स्टेशनचे एक विशेष पथक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या 8 मिनिटांत थेट त्या तरुणाच्या घरात दाखल झाले. पोलीस जेव्हा घरात पोहोचले, तेव्हा तो तरुण अत्यंत गंभीर आणि अर्धवट शुद्धीच्या अवस्थेत जमिनीवर पडलेला होता आणि त्याच्या शेजारीच विषाची बाटली उघडी होती. पोलिसांनी कोणताही वेळ न दवडता स्थानिक कुटुंबीयांच्या मदतीने त्याला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल केले, तिथे वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्याची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आहे.
वैद्यकीय उपचारानंतर मानसिक समुपदेशन आणि जगण्याचा नवा धीर
रुग्णालयातून प्रकृती सुधारल्यानंतर पोलिसांनी या तरुणाची सविस्तर चौकशी केली. प्रेमसंबंध संपुष्टात आल्यामुळे आपण प्रचंड मानसिक तणावाखाली होतो आणि त्याच नैराश्यातून हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. या संपूर्ण घटनेनंतर मेरठ पोलीस प्रशासनाने केवळ त्याचे प्राणच वाचवले नाहीत, तर त्याला या मानसिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तज्ज्ञांमार्फत आवश्यक ते भावनिक आणि मानसिक समुपदेशनही केले. तसेच त्याच्या कुटुंबीयांनाही धीर देत जगण्याची नवी उमेद निर्माण करून दिली.
3011 लोकांचे वाचले प्राण; तंत्रज्ञानाचे अनोखे सुरक्षा कवच
उत्तर प्रदेश पोलीस दल आणि मेटा कंपनी यांच्यात वर्ष 2022 मध्ये एक विशेष सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार फेसबुक किंवा इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर कोणत्याही व्यक्तीने स्वतःला इजा पोहोचवणारी किंवा आत्महत्ये संदर्भातील पोस्ट अथवा व्हिडिओ शेअर केला, तर मेटा त्याचे थेट अलर्ट थेट पोलिसांना पाठवते. उत्तर प्रदेश पोलिसांनी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, 1 जानेवारी 2023 ते 31 मे 2026 या साडेतीन वर्षांच्या कालावधीत अशा प्रकारच्या मेटा अलर्टवर त्वरित कारवाई करत पोलिसांनी तब्बल 3011 लोकांचे प्राण यशस्वीरित्या वाचवले आहेत.