मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या संगीत कार्यक्रमादरम्यान दोन एमबीए विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणात वनराई पोलिसांनी बुधवारी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. 33 वर्षीय जिया जेकब हिला उल्हासनगर येथून अटक करण्यात आली असून, ती या प्रकरणातील अकरावी आरोपी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य ड्रग्स पुरवठादार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयुष साहित्याच्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत असताना जिया जेकबचे नाव समोर आले. यानंतर पोलिसांनी तिची चौकशी करून बुधवारी (22 एप्रिल 2026) सायंकाळी अटक केली. तिची बँक खाती गोठवण्यात आली असून ड्रग्स पुरवठा साखळीत तिची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास सुरू आहे.
जेकबला गुरुवारी (23 एप्रिल 2026) रोजी बोरिवली न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात यापूर्वी 10 जणांना अटक करण्यात आली होती. यामध्ये आनंद पटेल, विनीत गेरेलानी, शुभ अग्रवाल आणि आयुष सहित्य यांसारख्या ड्रग्स पुरवठादारांचा समावेश आहे. मुख्य ड्रग्स पेडलर अद्याप फरार आहे.
हेही वाचा: Donald Trump: ‘भारतीय म्हणजे...’; युद्धजन्य परिस्थितीमुळे सैरभैर झालेले डोनाल्ड ट्रम्प भारताविरोधात बरळले
11 एप्रिल 2026 रोजी झालेल्या या कार्यक्रमात जमनालाल बजाज व्यवस्थापन अध्ययन संस्थेचे दोन विद्यार्थी मृत्यूमुखी पडले होते. प्राथमिक तपासात ड्रग्स ओव्हरडोस हे मृत्यूचे कारण असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणात रौनक खंडेलवाल आणि प्रतीक पांडे यांच्यासह काही विद्यार्थ्यांनाही अटक करण्यात आली होती.
वनराई पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 40 जणांचे जबाब नोंदवले आहेत. मृत विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. तसेच, नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, आयुष सहित्य हा या संपूर्ण ड्रग्स रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. त्याने इतर आरोपींसोबत आर्थिक व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. तसेच कार्यक्रमात बेकायदेशीर प्रवेश मिळवण्यासाठी सुरक्षा रक्षकांना पैसे दिल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून संपूर्ण ड्रग्स साखळी उघड करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
हेही वाचा: Sanjay Raut : बारामतीत मतदान, संजय राऊत यांनी डाव साधला; सुनेत्रा पवारांवर गंभीर आरोप