Rohit Arya Dies Mumbai Hostage Case: मुंबईतील पवई परिसरात आर. ए. स्टुडिओमध्ये 20 मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी रोहित आर्या पोलीस चकमकीत ठार झाला आहे. सर्व मुलांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. पोलिसांनी मुलांना एकामागून एक सुरक्षितपणे इमारतीतून खाली आणले. परंतु एकंदरीत या घटनेमुळे मुंबईसह राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. अशातच रोहित आर्याने कशाप्रकारे मुलांना कोंडून ठेवलं , पोलिसांनी कसं मुलांना वाचवलं, या सगळ्याची माहिती कोल्हापूरहुन ऑडिशनला आलेल्या नारायणी जाधव या मुलीने दिली आहे.
नारायणी जाधव म्हणाली की, माझं ऑडिशन आधीच झालं होतं. ट्रायल शूट आणि वर्कशॉपसाठी मी मुंबईत आले होते. तीन ग्रुप त्यांनी ऑडिशनचे केले होते आणि खरंतर या वर्कशॉपचा दिवस कालच संपला होता. तरी एक दिवस त्यांनी आजचा वाढवला. रोहित आर्यासोबत आम्ही मागील पाच दिवस कनेक्ट होतो आणि ते आमच्याशी खूप फ्रेंडली होते. थोड्या वेळासाठी आम्ही ज्या ठिकाणी होतो तिकडचा दरवाजा बंद ठेवला होता. त्यानंतर थोडा उघडला आणि आम्हाला वरती जायला सांगितलं. त्यानंतर पुन्हा त्यांनी डोर क्लोज केला आणि आम्ही त्यानंतर त्याला विचारलं की दरवाजा का बंद केला, आम्हाला वॉशरूमला जायचं आहे. त्यांनी सांगितलं की सीन सुरू आहे. त्याच्यामुळे आम्ही दरवाजा बंद केला आहे.
हेही वाचा: मुंबईत मोठा थरार! मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपी रोहित आर्यचा पोलिसांकडून एन्काऊंटर; गोळीबारात माथेफिरूचा मृत्यू
दरम्यान बराच वेळ झाला दरवाजा उघडत नव्हता त्यानंतर आमच्या पालकांचा आवाज खालून येत होता. माझी आजीसुद्धा माझ्यासोबत पाच दिवस होती. माझ्या आजीने खाली माझ्या आईला फोन लावला आणि माझी आई रडायला लागली. रोहित आर्याकडे बंदूक होती. तो मुलांना म्हणाला की, तुम्ही जास्त काही केलं तर तुम्हाला काहीतरी करेन. त्याने खाली पालकांना फोन करायला सांगितलं आणि तुम्हाला जिवंत घेऊन जायचं तर पैसे द्यायला लागतील असे सांगितले. त्यांने सगळ्यांनाच गन दाखवली. आम्ही थोडे घाबरलो होतो. मात्र पालकांनी सांगितलं आम्ही वरती येत आहोत, त्यामुळे आम्ही शांत झालो. एक डायरेक्टर होते त्यांनी आम्हाला वाचवायचा प्रयत्न केला. आम्ही दुसऱ्या रूममध्ये होतो. तेव्हा पोलिसांसोबत त्याची चकमक झाली आणि त्याला गोळ्या मारल्या असं नारायणी जाधव हिने सांगितलं.
नेमका प्रकार काय?
राजधानी मुंबईतील पवईच्या महावीर क्लासिक बिल्डिंगमील RA स्टूडिओमध्ये एका व्यक्तीने अनेक मुलांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली. ओलीस ठेवण्यात आलेली सर्व मुले 15 वर्षांखालील असून 17 मुला-मुलींना एका खोलीत बंद करुन ठेवण्यात आले होते. या मुलांसह दोन पालकही खोलीत बंद होते. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि NSG कमांडो पोहोचले. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांच्या (Police) मदतीने अखेर ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत मुलांची सुटका करण्यात आली. यावेळी, आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. पोलिसांच्या चकमकीत आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाला.
मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर झाला असून आरोपीने पोलिसांवर गोळी झाडल्यानंतर पोलिसांनीही जशास तसं प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी आरोपीच्या छातीत गोळी लागली होती. त्यामुळे, रोहित आर्यला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.