नागपूरच्या कपिलनगर परिसरात रविवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहर हादरले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शासकीय कार्यक्रमानंतर काही मिनिटांतच कार्यक्रमस्थळापासून काही अंतरावर एका मजुराची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. प्राथमिक तपासात अवघ्या १० रुपयांच्या चहाच्या पैशांवरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
रविवारी कपिलनगरजवळील नारा-नारी परिसरात सफाई कामगारांसाठी परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंडपावर अनेक मजूर काम करत होते.
या कामात सहभागी असलेले मनोज यादव (४५) हे दुपारच्या सुमारास जवळील चहाच्या हातगाडीवर गेले होते. तेथे चहा विक्रेता कैलास लालचंद गणवीर (४५) याच्याशी त्यांच्या पैशांवरून वाद झाला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, मनोज यांनी यापूर्वी घेतलेल्या दोन कप चहाचे पैसे बाकी होते. त्यानंतर आणखी एक कप चहा घेतल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली.
वाद वाढताच आरोपीने संतापाच्या भरात हातगाडीवर ठेवलेला धारदार चाकू उचलून मनोज यांच्या मानेवर वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या मनोज यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
विशेष म्हणजे, ही घटना घडण्याच्या काही मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांचा ताफा कार्यक्रमस्थळावरून रवाना झाला होता. कार्यक्रमासाठी शेकडो पोलीस तैनात असतानाही जवळच घडलेल्या या खुनामुळे पोलीस यंत्रणेतही एकच धावपळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी कैलास गणवीर याला ताब्यात घेण्यात आले असून खुनासाठी वापरलेले हत्यारही जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
प्राथमिक कारण चहाच्या पैशांवरील वाद असल्याचे समोर आले असले तरी या घटनेमागे इतर कोणते कारण आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली असून किरकोळ वादातून घडलेल्या या रक्तरंजित प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू आहे.