धाराशिव : नळदुर्ग किल्ल्यावर घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण धाराशिव जिल्हा हादरला आहे. तीन लहान मुलांसह किल्ल्यावरील खोल दरीत उडी घेत महिलेने आयुष्य संपवल्याची घटना समोर आल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. मृत महिलेची ओळख अश्विनी पौळ अशी असून, त्या राष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळलेल्या खेळाडू असल्याची माहिती समोर आली आहे.
अश्विनी पौळ यांनी कुस्तीच्या मैदानावर उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्राचे नाव उंचावले होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, पाच सुवर्ण आणि सहा रौप्य पदके मिळवल्याची माहिती आहे. कुस्ती क्षेत्रात त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणूनही ओळखले जात असल्याचे सांगितले जाते. क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेल्या खेळाडूने आपल्या तीन मुलांसह घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेत अश्विनी यांच्यासह त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर अडीच वर्षांची त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय पथक तिच्यावर विशेष देखरेख ठेवून आहे.
दरम्यान, अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी या घटनेमागे कौटुंबिक कारण असल्याचा आरोप केला आहे. पती आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक तसेच शारीरिक त्रास दिला जात असल्याने त्या त्रस्त होत्या, असा दावा त्यांच्या वडिलांनी केला आहे. या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलीस विविध बाजूंनी चौकशी करत आहेत.
अश्विनी पौळ या मुंबईत एमएसएफमध्ये नोकरी करत असल्याची माहितीही समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी नोकरी सोडल्याचे सांगितले जात असून, त्यामागे पती मनोहर पौळ यांचा आग्रह असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर त्या आपल्या तीन मुलांसह गेल्या काही काळापासून माहेरी राहत होत्या.
काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांवरून चर्चा सुरू असतानाच नळदुर्ग किल्ल्यावर घडलेल्या या घटनेने नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. ऐतिहासिक पर्यटनस्थळावर घडलेल्या या प्रकारानंतर सुरक्षेचा मुद्दाही चर्चेत आला आहे.
या प्रकरणात कौटुंबिक वाद, मानसिक तणाव आणि इतर परिस्थितींचा नेमका काय संबंध आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. कुटुंबीयांनी केलेले आरोप, घटनाक्रम आणि उपलब्ध पुरावे यांची पडताळणी झाल्यानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.