नवी मुंबई : उल्वे परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका भाड्याच्या घरात राहणाऱ्या नेपाळी कुटुंबातील पाच जण बेशुद्ध अवस्थेत सापडले असून, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. उर्वरित चार जण त्यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. सध्या गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेमागे विषबाधेचा संशय व्यक्त केला जात आहे.
गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. स्थानिक रहिवासी आणि घरमालक रमेेश घराट यांनी तीन दिवसांपासून या कुटुंबाकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घराचे दार तोडले असता आत सर्वजण बेशुद्ध अवस्थेत आढळले. पोलिसांनी तात्काळ सर्वांना पनवेल उपजिल्हा रुग्णालयात हलवले, मात्र संतोष बीरा लोहार (वय 22 ) या तरुणाला डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.
संतोषचा भाऊ रमेश लोहार, त्याची पत्नी बसंती आणि त्यांची दोन मुले आयुष (5) आणि आर्यन (2) या चौघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासात मृतदेहाजवळून कोणतेही बाह्य जखमेचे चिन्ह आढळले नसल्याचे नमूद केले आहे. तथापि, संतोषच्या तोंडातून फेस निघाल्याचे दिसून आल्याने विषबाधेची शक्यता तपासात आहे.
घटनेनंतर उल्वे परिसरात एकच खळबळ माजली आहे. या कुटुंबाने काही महिन्यांपूर्वीच हे घर भाड्याने घेतले होते. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक अडचणींमुळे हे कुटुंब गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होते. रमेशने नोकरी गमावल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे आर्थिक ताण वाढल्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
तथापि, पोलिस कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलेले नाहीत. आत्महत्या, अपघाती विषबाधा की अन्य काही कारण या सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. घटनास्थळावरून फॉरेन्सिक टीमने नमुने गोळा केले असून, अन्नपदार्थ, पाण्याचे सॅम्पल्स तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच घर सील करून सखोल चौकशी सुरू आहे.
नवी मुंबई पोलिसांचे अधिकारी सांगतात, 'कुटुंबाने तीन दिवसांपासून कोणत्याही शेजाऱ्यांशी संपर्क साधला नव्हता. घर बंद असल्याने शंका आली आणि मालकाने पोलिसांना कळवले. सध्या विषतज्ज्ञांचा अहवाल येईपर्यंत आम्ही कोणताही निष्कर्ष काढत नाही आहोत.' या दुर्दैवी घटनेनंतर उल्वे परिसरात नागरिकांमध्ये भीती आणि दुःखाचे वातावरण आहे. दोन निरागस मुलांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत आहेत. समाजमाध्यमांवरही या घटनेबद्दल सहानुभूतीची लाट उसळली आहे.