छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी स्मशानभूमीजवळ नितीन संकपाळ यांच्या हत्या प्रकरणात विशेष न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश देत त्यांच्या 5 मारेकऱ्यांना पुन्हा अटक करण्यास परवानगी दिली आहे. आरोपींना अटक करून 24 तासांत हजर करण्याचे आदेश गुरुवारी दिले. त्यामुळे नितीन यांच्या हत्येचा रखडलेला तपास आता पुन्हा सुरू होणार आहे.मस्तान ऊर्फ नन्ना हुसेन कुरेशी (29), समीर खान सरताज खान (19), बाबर शेख अफसर शेख (32), साजिद कुरेशी ऊर्फ सज्जू अहेमद कुरेशी (29) आणि नासीर खान मोहम्मद मुनीर खान (20) यांनी नितिन यांच्यासह सचिन संकपाळ आणि दत्ता जाधव यांच्यावर रात्री धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या घटनेत नितीन जागीच ठार झाले तर सचिन, दत्ता गंभीर जखमी झाले. एमआयडीसी सिडको पोलिसांनी 5 आरोपींना अटक करत सहाव्या विधिसंघर्षग्रस्त बालकाला बालसुधारगृहात पाठवले. मात्र, पोलिसांनी अटकेचे कारण लेखी न दिल्यामुळे तसेच नातेवाईकांना अटकेबाबत अधिकृतरीत्या न कळविल्याने न्यायालयाने आरोपींना जामिनावर मुक्त केले होते.
हेही वाचा: ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला शरद पवारांची दांडी?
•विशेष न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत, आरोपींचा पूर्वी तांत्रिक कारणास्तव मिळालेला जामीन कायम राहू शकत नाही.
•गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असून आरोपींची अटक आवश्यक असल्याचे नमूद करत पूर्वी दिलेला जामीन रद्द केला.
•पुन्हा अटकेनंतर 24 तासांच्या आत 3 आरोपींना न्यायालयात हजर करा, आरोपी दुसऱ्या गुन्ह्यात कोठडीत असतील तर हस्तांतरणासाठी स्वतंत्र अर्ज करण्याचे पोलिसांना स्वातंत्र्य आहे, असे यात म्हटले आहे.
•या आदेशाची प्रत पीडित, पोलिस व आरोपींना देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पोलिस आज आरोपींना हर्सल कारागृहातून ताब्यात घेत पुन्हा न्यायालयात हजर करतील.
नक्की काय घडलं ?
राजनगर, मुकुंदवाडी येथे राहणारे दत्ता बालाजी जाधव (वय 36) यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या जबाबावरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दत्ता हे शिवाजी पुतळ्याजवळ राहतात आणि एमजीएम रुग्णालयातील पंचकर्म केंद्रात मसाजर म्हणून काम करतात.
त्यांचे शेजारी राहणारे नितीन संकपाळ आणि त्याचा भाऊ सचिन हे त्याचे जुने मित्र होते. गुरुवार, 19 जून रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास दत्ता, नितीन, सचिन आणि नितीनचा मित्र राजीकचा दाजी असे चौघेजण एकत्र भेटले होते. सायंकाळी पाचच्या दरम्यान ते सर्वजण मुकुंदवाडी सिग्नलकडे गेले. तेथे नितीन आणि राजीकचा दाजी यांनी चिकन विकत घेतले आणि शेजारीच असलेल्या रायगड हॉटेलमध्ये ते शिजवायला दिले.
हॉटेलमध्ये बसून त्यांनी सर्वप्रथम कंटक्की खाल्ली आणि त्यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास जेवण केले. जेवण झाल्यानंतर दत्ता लघवीसाठी थोडा बाजूला गेला. तेवढ्यात नितीन, सचिन आणि राजीकचा दाजी हे हॉटेलच्या बाहेर रस्त्याच्या दिशेने बोलत गेले होते.
दत्ता परत येत असताना, सिग्नलजवळ चिकन दुकानासमोर पाच-सहा व्यक्ती सचिन आणि नितीन यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करत असल्याचे त्याने पाहिले. ते पाहताच तो धावत त्यांच्या मदतीसाठी गेला. मात्र त्या हल्लेखोरांनी दत्तावरही कोयते व चॉपरने हल्ला केला. तिघांनाही डोक्यावर गंभीर दुखापत झाली.पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना रिक्षाच्या मदतीने मिनी घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी नितीनला तपासून मृत घोषित केले.