रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीचा मोठा घोटाळा समोर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दापोली येथील काझी रहमान काझी इसा या वक्फ संस्थेची 621 गुंठे जमीन परस्पर विकण्यात आली असून, त्या जमिनीवर इमारती आणि आलिशान बंगले बांधण्यात आले आहेत. हा आरोप माजी नगरसेवक संजय सावंत यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा संपूर्ण व्यवहार वक्फ बोर्डाच्या परवानगीशिवाय झाल्याचा दावा आहे.
वक्फ कायद्यानुसार, वक्फ जमीन विकता येत नाही आणि कोणताही व्यवहार करण्यासाठी बोर्डाच्या दोन तृतीयांश सदस्यांची परवानगी लागते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने सत्ताधारी पक्षातील एका मोठ्या राजकीय नेत्यासह 44 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
नोटीसमध्ये काय म्हटले आहे?
1. वक्फ बोर्डाच्या परवानगीशिवाय जमीन विक्री आणि हस्तांतरण का केले?
2. सात दिवसांच्या आत याचा खुलासा करावा.
3. सदर जमीन वक्फच्या ताब्यात का घेऊ नये आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई का करू नये?
या नोटीसीमुळे दापोलीच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – Raigad: महाड एमआयडीसीत भीषण स्फोटाने थरकाप! 5 किलोमीटरपर्यंत हादरे; अनेक जण गंभीर जखमी
वक्फ म्हणजे काय?
वक्फ जमीन ही एखाद्या व्यक्तीने समाजाच्या हितासाठी कायमस्वरूपी दान केलेली जमीन असते. वक्फ बोर्ड हा या जमिनीचा मालक नसून केवळ व्यवस्थापक (Custodian) असतो. या मालमत्तेची देखभाल करणे, अतिक्रमण झालेली जमीन परत मिळवणे आणि त्यातून येणारे उत्पन्न धार्मिक व सामाजिक कामासाठी वापरणे, ही बोर्डाची मुख्य कामे आहेत.