छत्रपती संभाजी नगर: वाळूज औद्योगिक क्षेत्रातील प्रसिद्ध ‘सोडेक्सो’ कंपनीच्या कॅन्टीनमध्ये कामगारांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॅन्टीनमधील अस्वच्छता आणि निकृष्ट दर्जाचे अन्न पाहून एफडीए ने थेट कारवाई करत कॅन्टीन बंद केले आहे. या कारवाईमुळे वाळूज औद्योगिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वाळूज येथील गुडईयर साऊथ एशिया टायर्स कंपनीत सोडेक्सो इंडिया सर्व्हिसेस प्रा. लि. ही कंपनी कर्मचाऱ्यांसाठी कॅन्टीन चालवते. या कॅन्टीनमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि निष्काळजीपणा असल्याची तक्रार एफडीए ला मिळाली होती. तक्रारीची दखल घेत अधिकाऱ्यांनी 30 सप्टेंबर रोजी अचानक छापा टाकला. या तपासणीत हे कॅन्टीन गुणवत्तेच्या सर्व निकषांवर नापास ठरले असून, त्याला केवळ 42 टक्के गुण मिळाले.
हेही वाचा – जेवणासाठी घरी आला अन् सासूचे 4 लाख घेऊन पसार! संभाजीनगरात जावयाकडूनच सासूची फसवणूक
तपासणीत काय आढळले?
तपासणीदरम्यान कॅन्टीनमधील भयावह परिस्थिती समोर आली. स्वयंपाकघर, भाजी कापण्याची जागा आणि कामगारांच्या जेवणाची टेबले चिखल आणि घाणीने माखलेली होती. जमिनीच्या फरश्या तुटलेल्या तर सांडपाण्याच्या नाल्या तुंबल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. अन्न साठवण्यासाठी वापरण्यात येणारा फ्रीज गंजलेला आणि त्याचा दरवाजा तुटलेला आढळला. तसेच शाकाहारी आणि मांसाहारी अन्न एकाच ठिकाणी एकत्र साठवले जात होते, ज्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता. काही ठिकाणी शिळ्या अन्नावर कोळ्याची जाळीही आढळून आली.
एफडीए ची कठोर कारवाई
कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कॅन्टीनवर एफडीए ने तात्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. कॅन्टीनमधील स्वयंपाक, साठवणूक आणि जेवण वाढण्याचे सर्व कामकाज तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जोपर्यंत संपूर्ण स्वच्छता करून सुधारणांचा ठोस पुरावा सादर केला जात नाही आणि फेरतपासणी केली जात नाही, तोपर्यंत हे कॅन्टीन पुन्हा सुरू करू दिले जाणार नाही, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.