Tuesday, March 10, 2026 03:15:41 AM

Shirdi Flood Accident: शिर्डीत मोटारसायकलस्वार चार युवक वाहून गेले; दोन ठार, साताऱ्यातही दुर्घटना

महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे शिर्डीत दुर्दैवी अपघात घडला. मनमाड महामार्गालगतच्या ओढ्यात पाणी वाढल्याने चार जण वाहून गेले, त्यापैकी दोन ठार झाले.

shirdi flood accident शिर्डीत मोटारसायकलस्वार चार युवक वाहून गेले दोन ठार साताऱ्यातही दुर्घटना

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी परिसरातही पावसाचा जोर कायम असून, या अतिवृष्टीमुळे भीषण दुर्घटना घडली आहे. शिर्डी-साकुरी शिवारमधून जाणाऱ्या मनमाड महामार्गालगतच्या ओढ्यात पाणी वाढल्याने चार जण वाहून गेले. त्यापैकी दोन जणांना वाचवण्यात यश आलं, मात्र उर्वरित दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मृतांमध्ये प्रसाद पोपटराव विसपुते (कोपरगाव) आणि रोहित खरात यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन मोटारसायकलवरून हे चार युवक प्रवास करत असताना ओढ्यात आलेल्या पुराच्या पाण्यात ते अडकले आणि त्यांना वाहून नेलं. स्थानिक प्रशासन व मदत यंत्रणेने तत्काळ शोधमोहीम हाती घेतली, परंतु दोघांना वाचवण्यात अपयश आलं.

दरम्यान, साताऱ्यातील खटाव तालुक्यातही पूरपाण्याने आणखी एक दुर्घटना घडली. अंबवडे-गोरेगाव रस्त्यावरील येरळा नदीच्या पुलावरून जाताना एका व्यक्तीचा तोल गेला आणि तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली NDRF चा पथक घटनास्थळी दाखल झाला आहे. ड्रोनच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू असून, मृतदेह शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. वाहून गेलेल्या व्यक्तीची ओळख सुरेश रघुनाथ गायकवाड (अंबवडे) अशी पटली आहे.

पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी नदी-ओढ्यांमध्ये अजूनही पाण्याचा प्रवाह तीव्र आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तलाठी, पोलीस पाटील, महसूल अधिकारी यांच्यासह बचाव पथके घटनास्थळी उपस्थित राहून शोधकार्य वेगाने चालवत आहेत.

हवामान विभागाने ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली असल्याने प्रशासन सतर्क मोडवर असून, नागरिकांना अनावश्यक धोकादायक प्रवास टाळण्याचे आवाहन केले जात आहे.


सम्बन्धित सामग्री